Maharashtra and Karnataka Border Dispute: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी (Karnataka CM Basavaraj Bommai) आज सीमाभागातील जनतेच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यासाठी सीमाप्रश्न संपला असून महाराष्ट्र वाद उकरून काढत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना दिली असल्याचे त्यांनी म्हटले.  


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या जत, अक्कलकोट, सोलापूर अशा भागांवर दावा ठोकल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. बेळगाव सीमाभागाचा प्रश्न मागील काही दशकांपासून चिघळत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील भागांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. 


हुबळी येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य केले.  कर्नाटकच्यादृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे. पण महाराष्ट्र हे पुन्हा उकरून काढू पाहत आहे. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवणयाचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचेही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेत सौहार्द पूर्ण वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, अन्यथा...


महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात येणार आहेत.पण आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सध्या येऊ नये असा स्पष्ट लिखित संदेश पाठवला आहे.सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. 


महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात येणार आहेत. पण आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सध्या येऊ नये असा स्पष्ट लिखित संदेश पाठवला आहे. सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो.अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नसल्याचेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले.  


दौरा रद्द केला नाही, शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती


महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आपण दौरा रद्द केला नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी बेळगावातील मराठी बांधवांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा दौरा सहा तारखेला निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत हे कर्नाटक सरकारला कळवलं आहे. सविस्तर दौरा कळवलेला नाही. या घटकेला आम्ही दौरा रद्द केल्याबाबत अधिकृत कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत चर्चा करुन ते जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले.