Maharashtra Politics : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय जाहीर केला. मुनगंटीवारांच्या या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. सुधीर मुनगंटीवारांनंतर आता काँग्रेसच्या नव्या घोषणेची चर्चा आहे. मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम'च्या घोषणेनंतर आता काँग्रेसनं जय बळीराजाची घोषणा दिली आहे. 


काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. यासंदर्भात बोलताना वंदे मातरम् आमचा स्वाभिमान आहे, पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे, असंही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत. "वंदे मातरमला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळीराजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. 


काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार? 


काही दिवसांपूर्वी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी फोन संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'नं करण्याचं अभियान राबवणार, असं जाहीर केलं. नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली आणि चर्चांना उधाण आलं आहे. सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याचा आदेशामुळे वाद रंगला. रझा अकादमीनं या आदेशाला विरोध दर्शवला आहे. तर राज्याच्या राजकारणातूनही अनेक मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.


दरम्यान, सुधीर मुनगंटीवारांच्या निर्णयाला रझा अकादमीनं विरोध दर्शवला होता. ‘वंदे मातरम्’ ऐवजी दुसरा शब्द द्यावा, अशी मागणी अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी केली होती. याबाबत मौलाना आणि संबंधितांशी चर्चा करून राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचं नूरी यांनी सांगितलं. ‘वंदे मातरम्’ हा शब्द उच्चारण्यावरून अनेकदा वाद झाले होते. भाजप खासदार आणि एमआयएममध्ये या शब्दावरून संसदेत अनेकदा खडाजंगी देखील झाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Sudhir Munghantiwar : वंदे मातरमने मुस्लिमांचं काही नुकसान होत नाही; ब्राम्हण महासंघाचं मत