कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील घुणकीमधील भगवान जाधव यांनी काकडीच्या उत्पादनातून लाखोंचा नफा कमावला आहे. विशेष म्हणजे ऊस क्षेत्र कमी करुन अर्ध्या एकरात भाजीपाला लागवड सुरु केली.    

बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर भगवान यांनी वडीलांसोबत शेती करण्यास सुरुवात केली. दीड एकरात ऊस होत होता. 2014 साली भगवान यांचं लग्न झालं. शेतीचा सगळा दोर हाती आला. ऊसाच्या सरीच्या अंतरात त्यांनी बदल केले. ऊसक्षेत्र कमी करुन अर्ध्या एकरात भाजीपाला लागवड सुरु केली. यंदा त्यांनी याच अर्धा एकर क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे.

झेंडूच्या काढणीनंतर भगवान यांनी जमिनीची चांगली मशागत केली. पावणेपाच फूटांची सरी सोडून घेतली. त्यात निंबोळी पेंड, 10:26:26, 20:20:10, सुक्ष्म अन्नद्रव्यं दिली. 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला. त्याला अडीच फुटांवर भोकं पाडून घेतली. 3 सप्टेंबरला यावर सिंजेंटा युएस 827 जातीच्या काकडीच्या बियाणाचं टोकण केलं. 5 दिवसात बियाणांची उगवण झाली. यानंतर किडनाशक आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या. 20 व्या दिवसापर्यंत रोपांची चांगली वाढ झाली. यानंतर तारकाठी करुन वेली त्यावर चढवल्या.

भगवान यांनी तारकाठीचा प्रभावी वापर केला. सगळ्या वेली या अतिशय शिस्तबद्धपणे तारेवर चढल्या आहेत. यामुळे भगवान यांना सहजतेनं फवारणी करता येते. सगळ्या वेलींना सुर्यप्रकाश सारखा मिळातो. त्यामुळे त्यांची वाढही चांगली झाली. काकडीची प्रतही सुधारली. शिवाय मजुरांना काकडी सहजतेनं तोडता येतात.

इथं मजुरांकरवी काकडी तोडून आणली जाते. ती स्वच्छ पाण्यानं धूवून एका पोत्यात 50 किलो याप्रमाणे भरली जाते आणि स्थानिक बाजारपेठेसह मुंबई बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते.

काही महत्त्वाचे मुद्दे –

  • आतापर्यंत 16 तोड्यातून 18 टन काकडीचं उत्पादन

  • काकडीला बाजारात 8 ते 20 रुपयांपर्यंतचा दर

  • 18 टन काकडीतून 1 लाख 80 हजारांचं उत्पन्न

  • बियाणं, मल्चिंग, खतं, किडनाशकं, मजुरी, वाहतूक असा 48 हजारांचा खर्च

  • खर्च वजा जाता 1 लाख 32 हजारांचं निव्वळ उत्पन्न

  • आणखी 2 ते 3 टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा


ऊसाला भगवान यांनी ऊसाला भाजीपाल्याची जोड दिली. बाजारपेठेची गरज ओळखून कमी कालावधीची भाजीपाला पिकं ते घेत आहेत. यामुळे अवघ्या 3 महिन्यात त्यांना सव्वा लाखांचा नफा झाला आहे.

पाहा व्हिडीओ -