दिवाळीनिमित्त एक महिना क्लब सुरू ठेवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोरेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं गेल्या काही दिवसापासून निदर्शनास येत आहे.   2 नोव्हेंबर रोजी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले मारोती नंदे यांनी तक्रारदारास एक महिना पत्त्याच्या क्लब वर कोणतीही कार्यवाही करू नये यासाठी दहा हजार रुपये लाच मागितली होती. यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारीद्वारे संपूर्ण प्रकार कळवला. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर एसीबीच्या वतीने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली सत्यता आढळल्यानंतर एसीबीने दोन नोव्हेंबर रोजी सापळा रचला.


दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक असलेल्या मारोती नंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव पोलीस ठाण्यातच यशस्वी केला आहे. याप्रकरणी आता गोरेगाव पोलिसात आरोपी असलेल्या मारुती नंदे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे कारण अवैध धंद्यांना स्थानिक पोलिस अधिकारी पाठबळ देताना दिसून येत आहे. आता जिल्ह्यातील अवैध धंदे हे आव्हान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समोर आहे. 


जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत आहेत. काहीच दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी या जुगार आड्याकडे दुर्लक्ष केले होते. माहिती असूनही या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने शेवटी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने या जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले होते. 


भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली? आज खुलासा करणार; नवाब मलिकांना हाजी अराफत शेख यांचं आव्हान


जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी सुद्धा प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी करत 18 तारखेला उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे. त्यानंतर गोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशा पद्धतीने लाचलुचपत विभागाच्या  सापळ्यामध्ये रंगेहात पकडले जातात. यावरून जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी घालण्याचा पोलिसाचं काम करत असल्याचं स्पष्ट झाला आहे