Maharashtra Students Protest: परीक्षा ऑनलाइन (Online) घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे  (10th and 12th Board Exams) विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची चौकशी करण्याचे आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहे, त्या परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत. 


राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं कारण देऊन दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, असं शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज अचानक शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.  नागपूर, अकोला, औरंगाबाद आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केलंय. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदुस्थानी भाऊनेच विद्यार्थ्यांचे माथे भडकवण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप केला जातोय. 


हिंदुस्थानी भाऊ काय म्हणाला? 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात यावा, अशी मागणी हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओतून केली आहे. "कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब सावरलेलं नाही. आता ओमायक्रॉन आलाय. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षण दिलं जातंय. मग परीक्षा ऑफलाईन का? मी तुम्हाला विनंती करतोय की, विद्यार्थ्यांसोबत खेळू नका. कोरोनामुळं परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या भविष्याची खेळू नका, त्यावेळी मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो. परंतु, आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार. दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीन घ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी घ्या. नाहीतर एक मोठं आंदोलन उभं राहील. सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाहीतर तांडव होईल, गुन्हा दाखल केला तरी मी घाबरणार नाही", अशी धमकी हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओच्या माध्यमातून दिली.


मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथील विद्यार्थी रस्त्यावर
परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी मुंबई, नागपूर, औरंगाबाद उस्मानाबाद येथे रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे. तर, नागपुरात आंदोलक विद्यार्थ्यांकडून बसही फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha