Nagpur News नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात असणार आहे. त्या अनुषंगाने नुकतेच अजित पवार हे नागपूर विमानतळावर दाखल झाले असून त्यानंतर त्यांनी प्रथम नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जेथे आमचे आमदार 2019 मध्ये निवडून आले त्या सर्व मतदारसंघात मी जात आहे. त्या पार्शवभूमीवर आज काटोल विधानसभा मतदारसंघात माझी यात्रा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.


मात्र, हा मतदारसंघ माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा हा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदार संघात ठेवली आहे. मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महायुतीत या जागेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता बळावली असताना यावर अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, जागावाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली आहे. त्यामुळे निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटप करतांनाचा निकष असणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.    


अजित पवार गट 60 जागा मिळवण्याच्या तयारीत


लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. मात्र  त्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख केला आहे. काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे . यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार गट 60 जागा मिळवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 


हे ही वाचा