swabhimani shetkari sanghatana on sugarcane FRP : एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकरकमी ऊसाच्या एफआरपीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


दालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली, चर्चाही फिस्कटली 


शिरोळ तालुक्यात तीन कारखान्यांची ऊस वाहतूक रोखल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्याची (dalmia karkhana) ऊस वाहतूक रोखली आहे. दालमियाकडून पहिली उचल 3 हजार 75 रुपये जाहीर करण्यात आली आहे. 


तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिली उचल कमी असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन आणि संघटना पदाधिकाऱ्यांची झालेली चर्चाही फिस्कटली आहे. जोपर्यंत 3 हजार 75 पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखान्याच धुरांड पेटवू देणार नाही, असा इशाराच स्वाभिमानीने दिले आहे. 


पंचगंगा साखर कारखान्याची एफआरपी नाकारली 


पंचगंगा साखर कारखान्याकडून (panchganga karkhana) एफआरपी 3 हजार 50 एफआरपी जाहीर करण्यात आल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारखान्याची तोडणी, वाहतूक वजा करून 3 हजार 106 रुपये एफआरपी होत असताना 56 रुपये कमी एफआरपी जाहीर केल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. त्यामुळे ही एफआरपी मान्य नसल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. 3106 रुपये एफआपी जाहीर होत नाही तोपर्यंत गळीत हंगाम सुरु करणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचगंगा साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली होती. 


एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी स्वाभिमानी आक्रमक


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये, तसेच गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, अन्यथा ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा ऊस परिषदेत दिला होता. ऊस परिषदेत चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह 13 ठराव मंजूर करण्यात आले होते. 


या मागणीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील तिन्ही कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे. गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. आता यामध्ये दालमिया शुगर आणि पंचगंगा कारखान्याची भर पडली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीसाठी कारखानदार आणि स्वाभिमानीमध्ये संघर्ष अटळ दिसू लागला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या