Elephant Sundar : दख्खनचा राजा कुलदैवत जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या 'सुंदर' हत्तीचा कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये 27 ऑगस्ट रोजी निधन झाले. सुंदर हत्तीच्या निधनानंतर वारणा खोऱ्यापासून ते जागतिक पटलापर्यंत दखल घेतल्या गेलेल्या वादग्रस्त अध्यायाची एका दशकानंतर अखेर झाली आहे. सुंदर हत्तीला वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने आमदार विनय कोरे यांच्याकडून जोतिबा देवस्थानला भेट देण्यात आला होता. तथापि, सुंदर हत्तीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण 2012 मध्ये न्यायप्रविष्ठ  झाले होते. पेटा संस्थेने दिलेला लढा, 21 महिने चाललेली मोहीम तसेच महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सेलिब्रेटींनी दिलेला पाठिंबा यामुळे हे प्रकरण जगाच्या पाठीवर चांगलेच वादग्रस्त झाले होते. 


सुंदर हत्तीच्या वादाला सुरुवात कशी झाली? 


पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स People for the Ethical Treatment of Animals (PETA) ने आरोप केला होता की, वारणा समूहाने भेट दिलेल्या सुंदर हत्तीचे 2007 पासून जोतिबा देवस्थानकडून शोषण सुरु आहे. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. कालांतराने सन 2012 मध्ये, राज्य सरकारने सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले होते. तथापि, या  आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.


आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने पेटाचा न्यायालयीन लढा 


त्यानंतर PETA ने सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. विनय कोरे, यांनीही सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. दरम्यान, सुंदरला ज्योतिबा मंदिराच्या आवारातून वारणा नगर येथे हलवण्यात आले.


मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली


सुंदर हत्तीच्या सुटकेचा निर्णय न्यायालयात गेल्यानंतर विनय कोरे यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीला बंगळूर येथील अभयारण्यात तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि 2012 मध्ये मंजूर केलेला सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची मागणी करणारी विनय कोरे यांची याचिका फेटाळली. त्यामुळे पेटाने हा न्यायालयीन लढा जिंकला. सुंदरच्या सुटकेसाठी पॉल मॅककार्टनी, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, पामेला अँडरसन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, गुलशन ग्रोव्हर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता. 


सुंदरच्या सुटकेसाठी जगभरातून 21 महिने मोहीम 


सुंदरच्या सुटकेसाठी तब्बल 21महिने भारतासह जगाच्या पाठीवर मोहीम सुरु होती. न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर PETA इंडियाने महाराष्ट्राचे तत्कालिन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांना न्यायालयाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या व्ही. एम. कानडे आणि ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सुंदरच्या सुटकेचा आदेश दिला होता. तसेच सरकारी आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. 


सुंदरच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वादात ठिणगी 


त्या कालखंडात सुंदर हत्तीला मारहाण झालेला व्हिडिओ समोर आला होता. पशुवैद्यक आणि हत्ती तज्ज्ञांनी सुंदरची तपासणी केली असता त्यांना तो जखमी असल्याचे आढळले. साखळदंडाने बांधल्याने तो नीट झोपू शकत नव्हता. न्यायालयाच्या आदेशानंतर सुंदरची बंगळूरमधील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र (WRRC) मध्ये रवानगी करण्यात आली.


प्राण्याला साखळदंडात बांधून ठेवणे क्रूर


मुंबई उच्च न्यायालयाने एखाद्या प्राण्याला साखळदंडात बांधून ठेवणे हे क्रूर असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. पेटाने सुंदरची स्थिती ठिक नसल्याचे व्हिडिओग्राफिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. सरकारी अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या निवेदनात, सुंदरची प्रकृती अत्यावश्यक असल्याने त्यामुळे त्याला हलवता येत नाही, अशी विनंती केली होती, तर पेटाने टस्कर ठीक आहे, परंतु त्याचा प्रचंड छळ केला जात असल्याचे सांगितले होते.


अखेर सुंदरचे 27 ऑगस्ट रोजी निधन 


अशा प्रदीर्घ वादाची किनार लाभलेल्या सुंदर हत्तीचे अखेर 27 ऑगस्ट रोजी कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये निधन झाले. मृत्यू होऊनही कोणतीच माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाला तसेच जोतिबा देवस्थानला कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात संताप व्यक्त झाला. सुंदरच्या भेटीसाठी गेलेल्या भक्तांना सुंदरच्या निधनाची वृत्त समजताच धक्का बसला. त्यांनी तत्काळ आमदा डॉ. विनय कोरे यांनी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. निधनाचे वृत्त त्यांनाही अश्रु अनावर झाले कोल्हापूरमधील जोतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास सुंदर हत्तीला भेटण्यासाठी जात असत. 


वारणा परिसरातून संताप 


सुंदरच्या निधनाची माहिती वारणा उद्योग समूहासह ज्योतिबा देवस्थानला देणे आवश्यक होते. मात्र, तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सुंदर हा जोतिबा दैवताच्या पालखीचा मानकरी होता. निधनाची माहिती वास्तविक वारणेसह ज्योतिबा देवस्थानला कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे  झालं नाही. त्यामुळे सुंदरच्या निधनाने वारणा खोऱ्यापासून जगाच्या पाठीवर पोहोचलेल्या एका वादग्रस्त अध्यायाचा दुर्दैवी अंत झाला आहे. ज्या सुंदरसाठी वारणा खोऱ्याने संघर्ष केला आणि पेटानेही लढा  दिला त्या सुंदरचा अशा प्रकारे शेवट झाल्याने निश्चित वेदनादायी आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या