Shetkari Sanghatana : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसामुळं (Rain) वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी (Shetkari Sanghatana) सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. शेतीच्या नुकसानानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं आज सोशल मीडियात मोहीम चालवून या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विविध संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.


सकाळी 11 ते रात्री 11 या काळात सोशल मीडियावर ट्रेंड


परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटात दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारनं पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी आज (27 ऑक्टोबर) ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे. ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट आज सकाळी 11 ते रात्री 11 या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे, सरकारला या बाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.


काय आहेत नेमक्या मागण्या


राज्यभरातील संवेदनशील बुद्धिजीवी, लेखक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या मोहिमेत सामील होत आहेत. किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भ्रातृभावी संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,  खरीपाचे कर्ज माफ करावे,  शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी व अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी या मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. विविध शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.


ऑनलाईन ट्रेंडची मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं, किसान सभेचं आवाहन


सर्वत्र दीवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना शेतकरी मात्र पुरता बरबाद झाला आहे. शेतकरी बापाच्या मागं उभं राहण्याची हीच निर्णायक वेळ असल्याचे नवले यावेळी म्हणाले.
राज्य सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेनं केली आहे. यासाठी उद्या दिवसभर एला दुष्काळप्रश्नी ऑनलाईन ट्रेंडची मोहिम चालवली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन अजित नवले यांनी केलं आहे.  


महत्त्वाच्या बातमी : 


Kisan Sabha : ओला दुष्काळ प्रश्नी आरपार लढणार, किसान सभेचा इशारा, उद्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन ट्रेंड