मुंबई : 'अन्याय पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत सहानुभूतीपोटी चाललेल्या राजकीय भेटीगाठी थांबवाव्यात, असं आवाहन तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समर्थकांना केलं आहे. 23 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळांना आज मुंबई सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्याशी त्यांची भेट झाली.


''समर्थककांडून जोडो अभियान अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या अन्याय पे चर्चा कार्यक्रमाबद्दल भुजबळांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की, कार्यकर्त्यांनी भावनाप्रधान न होता संयम बाळगावा आणि सहानुभूतीपोटी चालवलेल्या राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी थांबवाव्या,'' अशी माहिती पंकज भुजबळ यांनी दिली.

''आपला न्यायालयीन प्रक्रियेवर आणि न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे. न्यायालयाकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत कार्यकर्त्यांनी भावनिक न होता संयम बाळगावा आणि आपले सामाजिक कार्य अखंड सुरु ठेवावं, अशा सूचना त्यांनी पंकज भुजबळ यांना केल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सूचनांचं पालन करावं,'' असं आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

भुजबळ समर्थकांनी काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवाय आणखी काही प्रमुख राजकीय नेत्यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र या भेटी थांबवण्यात याव्यात, असं आवाहन खुद्द छगन भुजबळ यांनी केलं आहे.