नागपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच शासनाच्या माध्यमातून खास किन्नरांसाठी शौचालयं बनवण्यात येणार आहेत. यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊल उचललं आहे.


एलजीबीटी समाजाचे काम करणारे काही कार्यकर्ते आणि किन्नर यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेतली आणि किन्नरांसाठी शौचालय बांधण्याच्या निर्णयाबाबत आभार व्यक्त केले.

किन्नरांना शौचालय कुठे हवे आहेत, ते कुठे राहतात आणि फिरतात यासंदर्भात सविस्तर सर्वेक्षण करुन, याच महिन्यात शौचालयं बांधण्याचं काम सुरु केले जाणार आहे.

शौचलयांसह किन्नर समाजाच्या अनेक समस्या आहेत. किन्नरांना कोणी घर भाड्याने देत नाही म्हणून जास्तीत जास्त किन्नर हे झोपडपट्टीत राहतात. तिथे स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी असलेल्या शौचालयात त्यांना जाऊ दिले जात नाही. म्हणून शेवटी त्यांना रेल्वेचे ट्रॅक गाठावे लागतात.

मुंबईतील गोवंडी परिसरात एका ट्रस्टने किन्नर समाजासाठी काही सुविधा दिल्या आहेत. खरंतर, सुप्रीम कोर्टाने किन्नर समाजासाठीच्या सुविधांसंबंधी काही वर्ष आधीच आपली भूमिका मांडली होती. पण तरीही अनेक राज्यांमध्ये अजूनही जागरुकता आणि संवेदनशीलता बघायला मिळत नाही.