अकोला : 'शेख अब्दुल रशीद'...आज या व्यक्तीनं दिवसभरात अकोल्यातील शासकीय व्यवस्थेचं 'ऑपरेशन' करत अक्षरश: उघडं पाडलं. तो आज दिवसभर फिरला. कधी एखाद्या रेशन दुकानात, तर एखाद्या कृषी केंद्रात... कधी महापालिकेत, कधी पाणपट्टीवर तर कधी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये... प्रत्येक ठिकाणी अब्दूलभाईंना दिसली ती फक्त खाबूगीरी. या दिवसभरातील ऑपरेशन' मध्ये पातूरच्या विदर्भ-कोकण बँकेच्या मॅनेजरमधील 'देव' माणूसही त्यांना दिसला. तर पैशाचं आमिष नाकारणारे पातूर तहसीलमधील काही चांगले कर्मचारीही भेटले. संध्याकाळपर्यंत हे सारं 'स्टिंग' चाललं. अन जेव्हा यातील धक्कादायक बाबी अब्दुल रशीद यांच्या पाहणीत समोर आल्यात तेव्हा यंत्रणेच्या पायाखालची जणू वाळूच सरकली. कारण 'गंगाधरही शक्तीमान है' या डॉयलॉगप्रमाणे ' बच्चू कडू हेच शेख अब्दुल रशीद होते' हे समजून गेले होते. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज स्वत:च 'स्टिंग ऑपरेशन' करीत स्वत:च्याच व्यवस्थेतील फोलपणा समोर आणला आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू हे ओळखले जातात त्यांच्या डॅशिंगपणामुळे... बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. आज त्यांनी चक्क वेशांतर करत विविध कार्यालयांना भेटी दिल्या. पालकमंत्री बच्चू कडूंच्या या अनोख्या कारवाईत अनेक चुकीच्या बाबी उघड झाल्यात. लाखोंचा गुटखाही पकडलाय. कसं झालं व्यवस्थेतील चांगल्या-वाईट अनुभवांचं बच्चू कडू यांचं हे 'स्टींग ऑपरेशन', सविस्तर पाहूयात...
असं झालं 'स्टींग ऑपरेशन'
बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात त्यांच्याकडे अनेक तक्रारी येतात. या तक्रारारींमध्ये सर्वाधिक तक्रारी असतात या अकोला महापालिका, पोलीस, अन्न-औषध प्रशासन विभाग, कृषी केंद्र आणि तहसील यांच्यासंदर्भातील. मंत्री असल्याने सरकारी तामझाम, ताफा आणि मागे-पुढे फिरणारं प्रशासन यांच्यामुळे जिल्ह्यात सर्व काही 'आलबेल' असल्याचं चित्रं त्यांच्यापुढे उभं केलं जातं. मात्र, बच्चू कडू यांच्यातील कार्यकर्त्यानं यात किती 'सत्य' आहे हे शोधण्याचा निश्चय केला. अन त्यातूनच पुढे आलं आजचं 'स्टिंग ऑपरेशन'. यात प्रशासनाच्या दाव्यातलं खरं 'सत्य' त्यांच्या समोर आलं. अन जिल्हा प्रशासनातील अनेक विभागांची 'पोलखोल' झाली.
आज सकाळी आठ वाजता ते अमरावतीवरून अकोल्याकडे निघालेत. त्यांनी हा आपला हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवला होता. त्यांच्या या दौऱ्याची ना प्रशासनाला भनकही होती. ना पोलिसांना कोणतीही माहिती. त्यांनी दर्यापुरात मुस्लिम व्यक्तीचं वेषांतर केलं. अंगात पांढरी शुभ्र पठाणी. डोळ्यात सुरमा, डोक्यावर मुस्लिमांची गोल टोपी. अन् नाव धारण केलं शेख अब्दुल रशीद. या अब्दूलभाईंना कोणत्या ठिकाणी काय अनुभव आला. अन यात 'खाबूगिरी'सोबतच काही चांगलं काम करणाऱ्या लोकांची ओळख झाली. बच्चू कडू यांच्यातील अब्दुलला कुठे काय दिसलं ते सविस्तर पाहूयात..
राशन दुकान (अकोटफैल-तारफैल) :
वेशांतर केलेल्या पालकमंत्र्यांनी पहिली 'एंट्री' केली ती अकोल्यातील अकोटफैल आणि तारफैल भागातील काही रेशन दुकानांवर... आपल्या घरी एक कार्यक्रम आहे. आपल्याला धान्य पाहिजे. या दुकानदारांनी त्यांना असं धान्य घेण्यासाठीचं 'अमाऊंट' सांगितल. अन् उद्या या धान्याचा पुरवठा करू असं सांगितलं. या मालाची रक्कम ठरवून अन् पत्ता देऊन 'अब्दूलभाई' पुढच्या 'स्पॉट'साठी रवाना झाले.
कृषीकेंद्र (दिपकचौक) :
पुढे 'अब्दुलभाई' आलेत टिळक मार्गावरील दिपक चौकात. हा चौक अकोल्यातील कृषी केंद्रांची रेलचेल असलेला. या ठिकाणी त्यांनी पेरणीसाठी एका विशिष्ट कंपनीच्या सोयाबीन बियाण्यासाठी विचारणा केली. काहींनी या बियाण्यांच्या भाव चढ्या दरात सांगितले. तर काहींनी हे बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले. यात त्यांनी जवळपास सहा-सात दुकानांवर आपलं 'स्टिंग' केलं.
पाणपट्टीवरून घेतला गुटखा विकत : 'सिटी कोतवाली' आणि 'जुने शहर' पोलीस :
पुढे अब्दूलभाईंना गुटखा हवा होता. मुलाला पाणपट्टी टाकून द्यायची आहे. त्यासाठी 'माल' पाहिजे, असं सांगत त्यांनी जुन्या कपडा बाजारातील 'भगवती पान सेंटर'वर धाव घेतली. त्याच्याकडून गुटखा कसा मिळतो आणि विकण्यासाठी कुणाशी कशी 'मांडवली' होते, हे त्यानं सविस्तर सांगितलं. गुटखा विक्रीतील अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांतले कोण 'लाभार्थी' आहेत याची 'बित्तंबातमी'ही समजली. जाताना त्यांनी येथून गुटख्याची काही 'बॉक्स' विकत घेतले. अन तेथून अब्दूलभाई पुढच्या 'ऑपरेशन' ला निघाले.
सिटी कोतवाली' आणि 'जुने शहर' पोलीस :
पुढे त्यांच्यातील एकाने 'अब्दुलभाईं'च्या गाडीत गुटख्याचे 'बॉक्स' असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना दिली. त्यांनी ते आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत चेंडू सिटी कोतवाली पोलिसांकडे ढकलला. त्यांनी नंतर याची माहिती 'सिटी कोतवाली' पोलिसांना दिली. तेव्हा अब्दूलभाई अगदी 'सिटी कोतवाली' पोलीस स्टेशनच्या अगदी बाहेरच उभे होते. यावेळी तेथील तीन पोलीस शिपाई आले. त्यांना 'टीप' मिळालेल्या गाडीची त्यांनी झाडाझडती घेतली. परंतु समोरच्या सीटच्या अगदी समोर ठेवलेला गुटखा त्यांना दिसत नव्हता. अब्दूलभाईंच्या 'पंटर'ने त्यांना समोर ठेवलेला गुटखा दाखवलाही. मात्र, त्यांनी गुटखा असा समोर ठेवू नका, असं सांगत त्यांना तेथून पिटाळून लावलं.
'अब्दुलभाईं'ना पातूरात आला 'वेगळा' अनुभव :
पुढे 'अब्दुलभाई' पोहोचले पातूरात. मात्र, या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव हा 'कही खुशी, कही गम' या प्रकारातला होता. या स्टिंग ऑपरेशनमध्ये बच्चू कडू यांना प्रशासनातील काही चांगल्या प्रवृत्तीही भेटल्यात. पातुर तहसीलमध्ये त्यांच्याकडून रेशन कार्डासाठी देण्यात आलेले पैसे नाकारण्यात आले. सोबत विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांनी कर्जासाठी पैसे देऊ पाहणाऱ्या वेशांतर केलेल्या कडूंना दम दिला. या बँक व्यवस्थापक दुबेंचा पालकमंत्र्यांनी नंतर सत्कारही केलाय. मात्र, सर्व ऑपरेशन संपण्यापूर्वी 'अब्दुलभाई' या परकायेतून 'बच्चू कडू' या मुळरूपात आलेल्या पालकमंत्र्यांनी पातूरातून एक लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला. यानंतर पातूर पोलिस स्टेशनमध्ये त्यांची 'एंट्री' पालकमंत्री म्हणून झाली. अन येथून सुरू झाली 'पोलखोल' झालेल्या प्रशासनाची धावपळ.
प्रशासनाची उडाली धावपळ :
संध्याकाळी या सर्व 'स्टिंग ऑपरेशन'चे 'रिझल्ट' बाहेर आलेत. अन् जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. भोंगळ कारभार दिसलेल्या सर्व विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर पाचारण करण्यात आलं. अन् या सर्वांची 'शाळा' पालकमंत्र्यांनी घेतली. सर्व दोषींवर चौकशी करून कारवाईचे आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.
पालकमंत्र्यांच्या 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये अकोला पोलीस आणि अन्न-औषध प्रशासन विभाग पूर्णपणे नापास :
आजच्या 'स्टिंग ऑपरेशन'नंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला पोलीसांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी दर्शविली. 'उपक्रमशिलते'चं रूपडं घेत असलेल्या 'खाबुगीरी'वर त्यांनी आज संबंधितांना चांगलेच फैलावर घेतले. अकोल्यातील अन्न-औषध प्रशासन विभाग फक्त 'वसुली'त 'मश्गुल' असल्यावर आजच्या 'स्टिंग ऑपरेशन'ने शिक्कामोर्तब केलं. या दोन्ही विभागाची 'साफसफाई' पालकमंत्र्यांना करावी लागणार आहे.
वारंवार करणार 'स्टिंग ऑपरेशन' :
अकोला जिल्ह्यातील या प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी असे 'स्टिंग ऑपरेशन' करणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं आहे. यानंतर या प्रवृत्तींविरोधात अशी धडक 'ऑपरेशन' करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
वर्षभरापूर्वी केलं होतं असंच 'स्टिंग' :
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात 14 मे 2020 ला एक असंच 'स्टिंग ऑपरेशन' केलं होतं. बैदपुरा भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून जाण्याचा बच्चू कडू यांनी प्रयत्न केला होता. शहरातील फतेह चौकातून बच्चू कडू यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना आतमध्ये जाण्यास विरोध केला होता. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता.