Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा किसान सभेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रादेशिक सहसंचालक विभागाला निवेदन सविस्तर चर्चा करण्यात आली. किसान सभेकडून कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार होती. परंतु, डॉ.एस.एन.जाधव, प्रादेशिक उपसंचालक, साखर यांनी किसान सभेकडून देण्यात आलेल्या निवेदनावर लिखित स्वरूपात माहिती देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आंदोलन स्थगित करून किसान सभेकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर देण्यात आलेल्या लिखित खुलाशाबाबत चर्चा करण्यात आली. 


देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर दराची तेजी पाहता, तसेच इथेनाॅल व इतर उपपदार्थांमधील उत्पन्न पाहता कारखानदारांकडे उत्पादन खर्च व नफा धरून वरकड उत्पन्न शिल्लक राहिले आहे, जे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, अशी किसान सभेची भूमिका आहे. उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात चर्चा घडवून आणून शेतकऱ्यांना १२ उताऱ्याला किमान 3500 रुपये प्रतिटन एकरकमी दर मिळाला पाहिजे, अशीही मागण केली आहे. 


जिल्ह्यातील कारखाने एकरकमी एफआरपी देत असले तरी त्याचे तुकडे पाडण्याचे धोरण रद्द झाले पाहिजे, असा आग्रह किसान सभेने धरला आहे. 


किसान सभेने मशिन तोड ऊसाची वजावट 4.5 टक्के करण्याच्या शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. काही कारखाने 1 टक्के वजावट करत होते त्यांनाही यामुळे 4.5 टक्के करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत उत्तर देताना अशोक जाधव  यांनी ही बाब शासनाकडे कळवू तसेच मशिन धारकांच्या मिटींगमध्येही मांडू अशी ग्वाही दिली.


सदर शिष्टमंडळामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रा.डाॅ.उदय नारकर, सचिव अमोल नाईक, नारायण गायकवाड,आप्पा परीट, विकास पाटील, अनिल जंगले,अक्काताई तेली, चंद्रकांत कुरणे, बसगोंड पाटील, कृष्णात चौगुले, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या