Ganpati On Note : राममंदिर  (Rammandir) उभारण्यापेक्षा हॉस्पिटल  (Hospital) उभं करा अस म्हणणारे केजरीवाल (Kejriwal) आता नोटेवर लक्ष्मी माता आणि गणपतीचा फोटो (Ganpati) लावा म्हणत आहेत. मात्र हे केजरीवाल ढोंगी हिंदू असल्याचा घणाघात अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केला आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर (Indian Rupees) भगवान गणेश आणि लक्ष्मीची छायाचित्रे प्रकाशित करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यावर अनेक पक्षाच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर अनेकांनी टीका केली आहे. नाशिकचे (Nashik) भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी देखील ताशेरे ओढले आहे. काही महिन्यांपूर्वी राम मंदिराला विरोध करणारे आज गणपती आणि लक्ष्मी चा फोटो नोटेवर छापण्यास सांगत आहेत, हे केजरीवाल ढोंगी हिंदू आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.


यावेळी तुषार भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू समाजासाठीच्या कार्यामुळे समस्त हिंदू समाज भाजपसोबत उभा आहे. श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, राम मंदिराऐवजी हॉस्पिटल उभं करा अशी मागणी करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आता नोटेवर गणपती आणि लक्ष्मी देवीच्या फोटोंचा आग्रह धरला आहे. तर यावरून केजरीवाल हे किती चुनावी हिंदू आहेत, हे यावरून सिद्ध होत आहे, अशा ढोंगी बाज लोकांना हिंदू समाज थारा देणार नाही, त्यांनी कितीही सोंग आणल तरी या देशातली जनता सक्षम आहे, की कोण खरे हिंदू आहे आणि कोण ढोंगी हिंदू आहे हे जनता दाखवून देईल, असा इशारा देखील यावेळी तुषार भोसले यांनी दिला आहे.


काय म्हणाले होते केजरीवाल?
केजरीवाल म्हणाले आहेत की, “आपल्या चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे चित्र असेल तर आपला देश प्रगती करेल. मी एक-दोन दिवसांत या विषयावर पंतप्रधानांना पत्र लिहीन. केजरीवाल यांनी इंडोनेशियाचे उदाहरण देत म्हटलं की, इंडोनेशिया मुस्लीम देश आहे आणि त्यांच्या चलनी नोटेवर गणपतीचे चित्र आहे. असं म्हणत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जर इंडोनेशिया हे करू शकतो, तर आपण का करू शकत नाही? या प्रतिमा नवीन चलनी नोटांवर छापल्या जाऊ शकतात." असे त्यांनी सुचविले आहे.


अनेक स्तरावरून टीका 
एकीकडे केजरीवाल यांनी नोटेवर गणपती, लक्ष्मी यांचा फोटो छापण्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरावरून टीका होत आहे. तसेच राज्यातील अनेक नेत्यानी इतरही व्यक्तींचे फोटो छापण्यात यावेत अशीही मागणी केली आहे. भाजपचे नितेश राणे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नोटेवर छापण्यात यावा. त्याचबरोबर राम कदम यांनी महापुरुषांचे फोटो लावण्यात यावेत अशीही मागणी केली आहे. सध्यातरी नोटेवर फोटो छापण्याचा वाद राजकीय वर्तुळात चांगलाच रंगला आहे.