Bacchu Kadu : "प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानं आपल्यावर केलेल्या आरोपाचं दु:ख असल्याच्या भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने आर्थिक अपहाराचा आरोप केलेल्या रस्त्यांची पाहणी आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. 'या प्रकरणात आपण दोषी आढळलो तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर स्वतःचे हात कलम करेन, असं आव्हान बच्चू कडू यांनी यावेळी दिलं आहे.


अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामात बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपानंतर राज्यपालांनी बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्यास परवानगी दिली होती. आज बच्चू कडू यांनी कुटासा येथील सुरू असलेल्या रस्ते बांधकामाला भेट देऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांना चष्म्याची गरज असल्याचा टोला बच्चू कडू यांनी यावेळी लगावला. 


काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी पडली तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 


पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.


महत्वाच्या बातम्या


राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत, बच्चू कडूंवर फौजदारी कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी


...अन् बच्चू कडू यांनी 'त्या' वृद्ध शेतकऱ्याला बसविलं व्यासपीठावरील आपल्या जागेवर