अकोला: महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंवर फौजदारी कारवाईसाठी राज्यपालांनी परवानगी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडूंवर अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता.
अकोला न्यायालयाने कारवाईसाठी राज्यपालांची मंजुरी घेण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले होते. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी 7 फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांनी कारवाईची परवानगी दिल्यानं राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण?
वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी पडली तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.
या रस्त्यांच्या कामात अपहार झाल्याचा वंचितचा आरोप :
1) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात 50 लाखांच्या अपहाराचा आरोप.
2) इजिमाला जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात 20 लाखांच्या अपहाराचा आरोप.
3) कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत 1 कोटी 25 लाखांच्या अपहाराचा आरोप.
पोलिसांनी तक्रार न घेतल्याने वंचितची न्यायालय आणि राज्यपालांकडे धाव
याप्रकरणी पोलीस कारवाई होत नसल्यानं वंचितनं अकोला जिल्हा न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सकृतदर्शनी गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं होतं. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याचं न्यायालयानं सुचित केलं होतं. यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात वंचितच्या शिष्टमंडळानं 7 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेत कारवाईसाठी परवानगीची मागणी केली होती. यासंदर्भात राजभवनानं 21 फेब्रुवारीला ही परवानगी दिली आहे. आज या परवानगीचं पत्र या प्रकरणातील मुख्य तक्रारदार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना प्राप्त झाले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फेटाळले आरोप
राज्यपालांच्या पत्रानंतर अद्याप बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात आपले राजकीय मित्र असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं हे आरोप केल्याचं दु:ख असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले होते.
बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करा: वंचित बहूजन आघाडी
दरम्यान, या पत्रानंतर आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं पत्रकार परिषद घेत राज्यमंत्री बच्चू कडूंवर त्वरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोला पोलिसांकडे केली आहे. न्यायालय आणि राज्यपालांच्या आदेशांना तरी अकोला पोलीस माननार की नाही?, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीनं अकोला पोलिसांना केला आहे.
बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकरांचे राजकीय संबंध तसे चांगले आहेत. मात्र, वंचितनं थेट बच्चू कडूंवर आर्थिक अपहाराचा आरोप करणं त्यांच्या अलिकडे बिघडलेल्या संबंधावर प्रकाश टाकणारा आहे. या दोन नेते आणि पक्षांमधले संबंध या आरोप-प्रत्यारोपांनंतर भविष्यात कसे राहतात?, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha