अकोला : बच्चू कडू... सध्या राज्याचे शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार अशा अनेक लांबलचक खात्यांचे राज्यमंत्री. मात्र, बच्चू कडू यांची याआधी एक ओळख आहे. ही ओळख आहे 'आंदोलक नेता', फायरब्रँड लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील माणूस अशी. एका पक्षाचा अध्यक्ष, राज्यमंत्री झाल्यावरही हा माणूस स्वत:ला नेता मानत नाही. कारण, त्यांना आपली ओळख आवडते ती 'कार्यकर्ता' म्हणून.... आज त्यांच्या एका साध्या कृतीनं मंत्रीपदाच्या 'प्रोटोकॉल'च्या धबडग्यातही त्यांच्यातील 'कार्यकर्ता' तसाच जीवंत असल्याचं दिसलं. त्यांच्या या साध्या अन् सहज वागण्यानं उपस्थितांची मन तर जिंकलीतच. परंतु, ज्याला हा अनुभव आला, त्याला पार गहिवरून आलं अन तो नि:शब्दही झाला.
ही घटना घडली अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या जांभा खुर्द गावात. अन् याला निमित्त होतं बच्चू कडूंनी आज अकोला जिल्ह्यातून सुरू केलेल्या 'कर्तव्य यात्रे'चं. यात त्यांनी आज संपुर्ण शासकीय यंत्रणा गावात नेत अनेक योजना आणि प्रमाणपत्रं नागरिकांना 'ऑन दी स्पॉट' दिलीत. यावेळी बच्चू कडू भाषण करीत असतांना लक्ष्मण सोळंके नावाचा वृद्ध व्यक्ती गर्दीतून आपली कैफियत मांडत होता. यावेळी राज्यमंत्री कडू यांनी या व्यक्तीला सन्मानानं व्यासपीठावरील आपल्या जागेवर बसवलं. व्यासपीठावर थेट राज्यमंत्री आणि जिल्हाधिकऱ्यांच्या मधात स्थान मिळाल्यानं हा वृद्ध शेतकरी मात्र नि:शब्द झाला.
...अन गर्दीतला 'लक्ष्मण' थेट व्यासपीठावर मंत्र्यांच्या जागेवर बसला
आज बच्चू कडू यांनी राज्यव्यापी 'कर्तव्य यात्रा' सुरू केली. बच्चू कडूंकडे असलेल्या खात्यांचा लाभ आणि शासकीय प्रमाणपत्र नागरिकांना जागेवरच देण्याचं नियोजन यात करण्यात आलं आहे. यासाठी संपुर्ण शासकीय यंत्रणाच आज जांभा गावात हजर होती. शासकीय प्रमाणपत्र लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी एकाच ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले होते. बच्चू कडूंच्या 'राहुटी' संकल्पेनवर आधारित ही 'कर्तव्य यात्रा' आहे. यात श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजनांसाठीच्या प्रमाणपत्रांचं लाभार्थ्यांना जागेवरच वाटप करण्यात आलं.
यावेळी जांभा गावात कार्यक्रमस्थळी बच्चू कडू यांचं भाषण सुरू होतं. बच्चू कडूंचं भाषण सुरू असतांना व्यासपीठाच्या डाव्या बाजूकडून एक वृद्ध व्यक्ती जोरजोरानं बोलत होता. त्याच्या बोलण्यानं बच्चू कडू भाषण करतांना काहीसे विचलित झालेत. त्यांनी भाषण थांबवत त्यांना काय झालं असं विचारलं. तो व्यक्ती बोलत-बोलत व्यासपीठाकडे येत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला काहीसं घेरलं. बच्चू कडूंनी पोलिसांना त्यांना व्यासपीठाकडे येवू द्या असं सांगितलं. कडू भाषण करीत असल्यानं त्यांची व्यासपीठावरील जागा खाली होती. त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला व्यासपीठावरील आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. मात्र, त्याला हे खरं वाटतच नव्हतं. मात्र, कडूंनी त्याला आग्रहानं आपल्या जागेवर बसवूनच घेतलं. जांभा गावातील एक सर्वसामान्य माणुस थेट राज्यमंत्र्यांच्या जाग्यावर जिल्हाधिकाऱ्या शेजारी बसला. या अनपेक्षित सन्मानानं हा माणूस काहीसा गांगरून गेला होता. लक्ष्मण सोळंके असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव होतं.
काय गाऱ्हाणं होतं शेतकरी लक्ष्मण सोळंके यांचं
लक्ष्मण सोळंके हा पुनर्वसीत जांभा खुर्द गावातील शेतकरी. कधीकाळी या सर्वसामान्य शेतकऱ्यानं गावाचं सरपंचपदही भूषवलेलं. पुनर्वसनाच्या दृष्टीने गावातील घरकुलांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित होता. त्यासाठी अनेकांकडे जागा उपलब्ध नसल्यानं ही कामं थांबली होती. लक्ष्मण यांनी यासंदर्भात अनेक ठिकाणी खेटे घातलेत अन चकराही मारल्यात. मात्र, प्रश्न 'जैसे थे'च होता. अखेर गावात मंत्री आल्यावर आपली मागणी मांडण्यासाठी लक्ष्मण यांनी पोटतिडकीनं आपलं म्हणनं मांडलं. अन् यासाठीचा आवाज आतापर्यंत कुणीच ऐकत नसल्यानं त्यानं आवाज काहीसा वाढविला. अन मंत्री बच्चू कडूंनी त्याच्या आवाजाला थेट व्यासपीठावर नेत सन्मान दिला.
लक्ष्मण सोळंके झालेत भावुक आणि नि:शब्द
एरवी आपल्या प्रश्न सोडवतांना लक्ष्मण यांच्या नशिबी आतापर्यंत उपेक्षाच आलेली. मात्र, आज त्यांचं म्हणनं पालकमंत्र्यांनी शांतपणे ऐकूनही घेतलं. त्यांना व्यासपीठावर सन्मानानं आपली जागाही दिली. अन त्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट आदेशही दिलेत. या अनपेक्षित सन्मानानं ती काही काळ गांगरलेही. त्यांच्या भावना यावेळी नि:शब्द झाल्या होत्या. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना त्यांनी बच्चू कडू यांचा उल्लेख 'दाता' म्हणून करीत या अनोख्या सन्मानाबद्दल आभारही मानलेत. दरम्यान, कार्यक्रमस्थळी बच्चू कडू यांच्या या कृतीचीच उपस्थितांमध्ये चर्चा होती.
बच्चू कडू म्हणालेत 'हेच खरं प्रजासत्ताक, प्रजा हिच राजा'
यावेळी झालेल्या भाषणात बच्चू कडू यांनी सर्वसामान्य जनता हिच खरी या देशाची 'मालक' आणि 'राजा' असल्याचं म्हटलं. लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, हे चित्र सध्या उलटं झाल्यानं लोकप्रतिनिधी राजासारखे वागायला लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रजा हिच या देशाची मालक आहे, हे लोकांना सांगण्यासाठीच लक्ष्मण सोळंकेंना व्यासपीठावरील आपली जागा दिल्याचं बच्चू कडू म्हणालेत. या सन्मान आणि त्या स्थानाची खरी मालक जनताच असल्याचं ते म्हणालेत.