Beed News Update : शेतीच्या वादातून चुलता आणि पुतण्यामध्ये झालेल्या मारहाणीत चुलत्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील आडस इथे घडली आहे. अंकुश गायके असे मृत्यू झालेल्या चुलत्याचे नाव आहे. तर संदीप गायके असे संशयित आरोपी पुतण्याचे नाव आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
गुरुवारी रात्री दहा वाजता आडस येथील शेंडगे यांच्या दुकानासमोर अंकुश गायके आणि संदीप गायके यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड आणि लाकडाने मारहाण करण्यात आली. यात अंकुश गंभीर जखमी झाले. त्यामुळे गंभीर अवस्थेतच अंकुश यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.
अंकुश गायके यांच्या डोक्यात लाकडी फळी मारुन त्यांना जखमी केले, अशी फिर्याद विजय नामदेव गायके यांनी दिली आहे. त्यावरून संशयित आरोपी संदीप प्रभाकर गायके याच्या विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर संदीप याच्या फिर्यादीवरून विजय नामदेव गायके, अंकुश नामदेव गायके, नामदेव गायके आणि दयानंद गायके या चौघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आधी दाखल झालेल्या गुन्ह्यात 302 कलमाची वाढ होईल आणि आरोपी संदीप गायके याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संदीप गायके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Beed: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल; आरोप खोटे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा
- Beed: बीड जिल्ह्यात कत्तलखान्यांवर महिनाभरात चार कारवाया, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
- बीड प्रशासनाचा तुघलकी कारभार! आता तर हद्दच झाली, क्रीडा संकुलातील चार झाडे पुन्हा तोडली
- Beed Tree: रोग म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला! आंदोलन करतात म्हणून झाड तोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी निर्णय