मुंबई : राज्याचा 2019-20  वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर यानंतर जून - जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

आज सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुढील 3 महिन्याच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. असं असलं तरी दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद अर्थसंकल्प मांडताना करावी लागणार आहे. तसंच 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाकडे वाटचाल करणाऱ्या राज्यासाठी काही लक्षवेधी घोषणा राज्य सरकार करणार का? याकडे लक्ष लागलेलं आहे.

दुष्काळ निवारणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे.  दुष्काळग्रस्त 82 लाख शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असून 42 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा झाल्याची तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती तसेच यावेळी त्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा पुनरुच्चार ही केला होता.