पंढरपूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटार-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच मयत  झाले असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील शिराळ पाटीजवळ घडला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या 10 वर्षांच्या नातवाचा समावेश आहे.

मृतक व जखमी एकाच कुटुंबातील असून उंडेगाव, तालुका परांडा, जि. उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत.  नवनाथ  गायकवाड (55)  अलका गायकवाड (45) ,  सूरज उर्फ काळू किरण कांबळे (वय-10) अशी मृतांची नावे आहेत. तर अक्षय गायकवाड (27) आणि गिरज कांबळे (8) अशी जखमींची नावे आहेत. यातील गिरज कांबळे याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी इंदापूर येथे हलविण्यात आले आहे.

हे सर्वजण भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याकडे भिवा चौधरी या मुकादमच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत होते. ते सुर्ली येथे राहत होते. दोनच दिवसापूर्वी कारखाना बंद झाला झाल्याने हे सर्वजण गावी जाणार होते.  हिशोब पाहण्यासाठी ते सर्वजण माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक कारखान्यात गेले होते. काम झाल्यानंतर ते सर्वजण मोटारसायकलवरून सायंकाळी सुर्लीकडे निघाले होते. महामार्गावरून शिराळ येथे महामार्ग ओलांडून पुढे जाताना पाठीमागील कारने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली .