गडचिरोली :  नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी, तसेच नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाने नुकतेच परिपत्रक काढून 31 कोटी 89 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जिल्ह्याच्या संवेदनशील भागातील सुरक्षा वाढविण्यात येणार असून पोलीस मदत केंद्राची पक्की इमारत बांधण्यात येणार आहे.


नक्षल चळवळीवर लक्ष ठेवण्यासाठी मानवरहित वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे.

नेहमीच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला बाधा ठरणाऱ्या नक्षलवाद्यांवर लगाम कसण्यासाठी आता राज्य सरकारने कंबर कसली आहे. नुकतेच गृहराज्य मंत्रालयाने 31 कोटी 89 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून नक्षलग्रस्त अहेरी तालुक्याच्या येलचील आणि एटापल्ली तालुक्याच्या आलदांडी या अस्थायी पोलीस मदत केंद्राची पक्की इमारत बांधणार आहेत. तसेच या निधीतून संवेदनशील भागातील रस्त्याचे बांधकामही करण्यात येणार आहे.

दुर्गम भागातील खराब रस्त्यावरुन सहज धावू शकणारे नवीन वाहनही खरेदी करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे धोक्यात आलेल्या सुरजागड लोहप्रकल्पालाही या निधीतून विशेष सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सुरजागडच्या सुरक्षिततेसाठी मानवरहित वाहन आणि ड्रोन खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच लोह खनिजाचे उत्खनन करण्यात येणाऱ्या पाहाडावर नवीन पोलीस चौकीची निर्मितीही करण्यात येणार आहे.