Pune News Update : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) काल पुणे दौऱ्यावर असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पुणे महिला विभागाच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या संदर्भात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने (State Commission For Women) दखल घेतली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. 


वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याबद्दल भाजपच्या भस्मराज तिकोणे, प्रमोद कोंढरे आणि मयुर गांधी या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने याबाबत माहिती घेऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.


"केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करावी," असे राज्य महिला आयोगाने म्हटले आहे. 






काय आहे प्रकरण? 


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल (16 मे) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वैशाली नागवडे आणि त्यांच्या सहकारी महिलांकडून बालगंधर्व रंगमंदिरात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि विनयभंग झाल्याचा वैशाली नागवडे यांनी आरोप केल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  


महत्वाच्या बातम्या


Pune News : राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण, भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा