मुख्यमंत्र्यांनी या सहाही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.
प्रकाश महेता आणि विष्णु सावरा यांच्या कारभारावर अनेकदा बोटं उठली होती. मेहता यांच्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देखील अडचणीत आले होते. तर सवरा यांच्या आदिवासी विभागावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते.
प्रकाश महेतांना एम पी मिल कंपाऊंड प्रकरण भोवलं
प्रकाश महेता यांना एम पी मिल कंपाऊंड प्रकरण चांगलंच भोवलं. या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाचा दुरुपयोग झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येताच मुख्यमंत्र्यांनी लोकयुक्तांची चौकशी लावून यातून हात झटकले. लोकायुक्तांच्या चौकशी अहवालातही महेता यांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांच्या अडचणी वाढल्या. यामुळे मुंबईतला गुजराती चेहरा आणि मोदी - शाह यांच्याशी असलेले जवळचे संबंधही कमी आले नाही. त्यामुळे अखेर महेता यांना गृहनिर्माण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आदिवासी विकास विभागाचा झिरो परफॉर्मन्स
आदिवासी विकास विभागाचा झिरो परफॉर्मन्स असल्याने विष्णू सवरा यांना डच्चू देण्यात आला. पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सवरांची कामगिरी निराशाजनक राहिली. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी पाड्या वस्त्यांवर आरएसएसचं मोठं जाळं असूनही लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार आयात करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. इतकंच नाही तर श्रीनिवास वणगांच्या बंडामुळे पालघरची जागा लोकसभा निवडणुकीत अखेर शिवसेनेला सोडावी लागली. याखेरीज सवरा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.
नैतिक जवाबदारी स्वीकारून प्रवीण पोटेंचा राजीनामा
प्रवीण पोटे हे अमरावतीचे पालकमंत्री असूनही तिथे तर युतीला नवनीत राणांकडून पराभव पत्कारावा लागला. या पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून प्रवीण पोटे ह्यांनी आधीच मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठवला होता.
बडोले आणि आत्रामांचं मतदारसंघात दुर्लक्ष
अंबरीश आत्राम हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. तिथे लोकसभेला इतर क्षेत्रांपेक्षा त्यांच्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपला सर्वात कमी मताधिक्य मिळाले. तर बडोले हे भंडारा गोंदियाचे पालकमंत्री असूनही त्यांच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभेत भाजपला सर्वात कमी लीड मिळाला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारी दरम्यानच आमदारांचे रिपोर्ट कार्ड दिले होते. त्यात ह्या तिघांकडून आपला परफॉर्मन्स जास्त चांगला करावा ही अपेक्षा असल्याचा शेरा मिळाल्याची माहिती आहे.
पक्षापासून ते सामान्य माणसांशी 'महाराज' ह्याच भावनेतून वावरणाऱ्या आत्रामांविषयी बरीच नाराजी होती. ज्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असे म्हणावे लागेल. बडोले ह्यांच्या बाबतीत ते सर्वांचे काम करत नाही, विशिष्टच लोकांची कामे होतात अशी भावना ही कार्यकर्त्यांत झाली होती. येत्या काळात विधानसभेत भंडारा गोंदियातून विधान परिषद आमदार असलेले आणि आता मंत्री झालेले परिणय फुके ह्यांची जबाबदारी वाढवण्याचे मनसुबे मुख्यमंत्र्यांचे आहेत. बडोले ह्यांना काढून फुकेंसाठी मंत्रिमंडळात जागा केल्याचे बोलल्या जात आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने भाजपला भरभरून यश दिले आणि परिणामी इतिहासात कधी ही न मिळाल्या इतक्या जागा मंत्रिमंडळात विदर्भाच्या आमदारांना मिळाल्या. मात्र आजच्या कॅबिनेट विस्तारात प्रवीण पोटे, राजकुमार बडोले आणि अंबरीश आत्राम हे विदर्भाचे तीन मंत्री बाद करण्यात आले आहेत.