नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित राज्य मंत्रीमंडळाचा आज (रविवारी) विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 10, शिवसेनेचे 2 तर रिपाइंच्या एका नेत्याला मंत्रीपदाची शपथ दिली. नव्या मंत्रीमंडळात सुरुवातीलाच पक्षात आलेल्या नव्या नेत्यांना प्राधान्य दिले गेले. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्रीपदापासून दूर ठेवलेल्या एकनाथ खडसेंनी खदखद व्यक्त केली आहे.

मंत्रीपदापासून लांब ठेवल्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मंत्रीमंडळात जायला मला आता पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. पक्षाने आयात केलेल्या नेत्यांना संधी देणे सुरु केले आहे.

खडसे म्हणाले की, पक्षाने आयात नेत्यांना संधी दिली आहे. परंतु त्याच वेळेला पक्षातील जुन्या नेत्यांना डावलले आहे. आमच्या पक्षात असे अनेक नेते आहेत जे चार-पाच वेळा निवडून आलेले आहेत. तरीसुद्धा त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते दुःखी आहेत, त्यांचे दुःख सहाजिक आहे.

व्हिडीओ पाहा



खडसेंना मंत्रीपद दिले गेले नाही, याबाबत खडसेंना विचारले असता खडसे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीला अवघा तीन महिन्यांचा काळ राहिला आहे. त्यापैकी दीड महिने आचार संहितेत जातील. त्यामुळे जाता-जाता नावापुरतं मंत्रीपद घेण्यात काय अर्थ?