नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत काडीमोड करणाऱ्या शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापनेची खलबतं करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कौतुक चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह बिजू जनता दलाचे देखील कौतुक केले आहे. या दोन्ही पक्षांकडून माझ्यासह इतर पक्षांनी काहीतरी शिकायला हवे असे मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्यसभेच्या 250 व्या ऐतिहासिक अधिवेशनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात बोलत होते. 'भारतीय राजकारणात राज्यसभेची भूमिका, पुढील मार्ग' या विषयावर झालेल्या विशेष चर्चेत ते बोलत होते.

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचं कौतुक अशावेळी केलं आहे, ज्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला गेले आहेत.


यावेळी ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बीजेडी या दोन पक्षांचं कौतुक करतो. या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी संवाद थांबवण्याऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा, असेही मोदी म्हणाले.

या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला आहे, तसेच अनेक इतिहास घडताना पाहिला आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी या सभागृहाचे नेतृत्त्व केलं आहे. ही बाबही अभिमानास्पद असल्याचे मोदी म्हणाले. आत्तापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे असेही मोदी यावेळी म्हणाले.



यावेळी मोदी म्हणाले की, या सभागृहाच्या माध्यमातून देशवासियांसाठी देखील एक जागृतीची संधी बनू शकते. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे. हे सभागृह नियंत्रण आणि संतुलन ठेवण्याचे काम करते. त्यामुळे बॅलंस आणि ब्लॉकमध्ये अंतर ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले.