मुंबई : एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. नवीन भरती झालेल्या 1148 कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कर्मचाऱ्यांचे अजून 180 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत. मात्र यांचा संपात सहभाग जास्त आढळून आला होता.


विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 8 जून रोजी संप पुकारला होता. दोन दिवस या संपात हे कर्मचारी सहभागी झाले होते. वारंवार संप केल्याने एसटी महामंडळाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. त्यामुळे हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील एसटीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये कारवाई सुरु आहे. या कर्मचाऱ्यांच्या जागेवर जे उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये होते, त्यांना सेवेत घेतलं जाणार आहे. यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक, लेखनिस यांचा समावेश आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवारांना लॉटरी लागणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.

दरम्यान, एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात सकारात्मक निर्णय झाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषण करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवरही या बैठकीत तोडगा काढण्यात आला होता. मात्र गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं रावतेंनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या :

एसटीचा संप मिटला, मागण्यांवर सकारात्मक तोडगा


सांगली आणि अहमदनगरला शिवशाही बसवर दगडफेक