मुंबईत एसटीच्या मान्यताप्राप्त संघटना आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
''एसटी कर्मचाऱ्यांनी या राजकारणात पडू नये''
''इतकी वर्षे पगार नव्हते तरी कामगार काम करत होते. आता पगार वाढ देऊनही संप केला. कामगारांनी या राजकारणात पडू नये,'' असं आवाहन दिवाकर रावतेंनी केलं.
शिवाय दोन वेळा संप करुनही कारवाई केली नाही, मेस्मा फाईलवर सही केली नाही, यापुढे असं पाऊल उचलू नये, असंही रावते म्हणाले.
''अगोदर पगार किती वाढलाय ते समजून घ्या''
''महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली आहे. ही वेतनवाढ करारामध्ये परावर्तित करण्यासाठी एसटी प्रशासन आणि संघटना यांनी बैठक घेऊन वेतनवाढ बसवून घ्यावी,'' असं आवाहन रावतेंनी केलं.
''कर्मचाऱ्यांमध्ये या वेतनवाढीसंदर्भात उलट-सूलट गैरसमज निर्माण झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी असं न करता आपली वेतनवाढ नेमकी किती झाली हे आधी समजून घेणे गरजेचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यात आली असून अचानक पुकारलेला बेकायदेशीर संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावे,'' असं आवाहन रावतेंनी केलं.
कर्मचाऱ्यांवरील कारवाईचं काय?
''एसटी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यानच्या केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यावरील कारवाई वगळता इतर प्रकारच्या कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येईल,'' अशी माहितीही रावतेंनी दिली.
''... तर सातव्या वेतन आयोगानुसार बदल करु''
घरभाड्याचे टप्पे 7-14-21 सध्या दिले आहेत. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत असताना हे टप्पे जर 8-16-24 करण्यात आले तर त्यानुसार आम्ही पण करु, असं रावते म्हणाले.
शिवाय वार्षिक वेतनवाढ दर हा आम्ही दोन टक्क्यांवर आणला, तो राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना तीन टक्के ठेवला तर आम्हीही त्यात बदल करु, अशी ग्वाही रावतेंनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारात दुप्पट वाढ
एसटी महामंडळाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. शिवाय वेतन करारात दुपटीने वाढ करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर गेले.
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार अनेक कारणांनी रखडला असल्याचं सांगत, आतापर्यंत झालेल्या सर्व वेतन करारांपैकी दुप्पट वाढ देणार असल्याचं रावते म्हणाले.
शिवशाहीचं सरकार असताना 1996 ला 72 कोटींचा करार केला. सगळ्याच सरकारच्या कार्यकाळात दोन वर्षांपर्यंत करार रखडले. तरीही याच सरकारवर टीका करण्यात आली. पाप कुणाचं अन् ताप कुणाला अशी माझी अवस्था झाली असल्याचंही रावते म्हणाले.
2012 ते 2016 या काळात 1240 कोटींचा करार होता. 2016 ते 2020 सालापर्यंत 4849 कोटींचा करार करण्याचा निर्णय घेत असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
सातव्या वेतन आयोगाचं सूत्र वापरून 2.57 नुसार वेतनवाढ केली आहे. या वेतनवाढ कराराचा 47 हजार ते 50 हजार कर्मचाऱ्यांना फायदा होईल. यासाठी 176 कोटी रुपयांचा भार महामंडळ स्वीकारत आहे, अशी माहिती रावतेंनी दिली.
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामधली विकृती नष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं रावतेंनी जाहीर केलं.
हजेरी प्रोत्साहन - 180 रुपयांवरुन 1200 रुपये
धुलाई भत्ता - 50 रुपयांवरुन 100 रुपये
वुलन धुलाई भत्ता - 18 रुपयांवरुन 100 रुपये
रात्री तीन तास काम केल्यास तीन रुपये भत्ता मिळायचा, तो आता 35 रुपये मिळणार
रात्रपाळी भत्ता चार रुपये होता, तो आता 75 रुपये मिळणार
जिल्ह्याच्या ठिकाणी 15 रुपये भत्ता होता, तो 100 रुपये मिळणार
घोषित केलेला करार मान्य असेल तर पाच वर्षातील कर्मचाऱ्यांना,
कनिष्ठ श्रेणीसाठी ( 5 वर्षे ) 4000 ते 9000 अशी वाढ होणार
कनिष्ठ श्रेणीसाठी ( 3 वर्षे ) एक हजार ते 5 हजार अशी वाढ असणार
जे कर्मचारी नुकतेच आले आहेत, त्यांना 2000 रुपये वाढ
ज्येष्ठ कर्मचारी यांना 12 हजार रुपये वेतनवाढ
एकूण वेतनातील 4275 ते 9105 वाढ
यामुळे 4500 कोटी तोटा होणार आहे.
संबंधित बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करारात दुप्पट वाढ, रावतेंची घोषणा
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचं दोन दिवसात 33 कोटींचं नुकसान