धुळे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.


दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारातून सुमारे 20 टक्के बसच्या फेऱ्या सुटल्या. राज्यातील 25 आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच 151 आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती.

राज्यातील 97 आगारातून दिवसभरात एकही बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहेत.

तुलनेने मराठवाडा आणि विदर्भामध्ये 40 टक्के वाहतूक सुरु होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत होणाऱ्या 32 हजार 148 बस फेऱ्यांपैकी सहा हजार 308 फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी

जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी