रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात सर्वांची लाडकी एसटी. गावच्या वाहतूक विभागाचा कणा असलेला एसटी विभाग सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे अशा कारणांमुळे एसटी कायम चर्चेत राहते. सध्या एसटीनं स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय देखील दिला आहे. खर्च आणि उत्पन्न यांचं गणित, यांचा मेळ बसत नसल्याचं एसटीची आर्थिक बाजू कमजोर होत आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी तर अनेक प्रयत्न केले जात आहेत. नवीन योजना राबवल्या जात आहेत. पण, त्याला म्हणावं तसं यश अद्याप तरी मिळाल्याचं दिसून येत नाही. त्यात लॉकडाऊन लागला आणि एसटीच्या समस्या आणखी वाढल्या. सारे व्यवहार ठप्प झाल्यानं एसटीचा तोटा वाढू लागला. याच काळात सकारात्नक विचार करत एसटीनं मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला परवानगी मिळाल्यानंतर यातून एसटीला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. रत्नागिरी एसटी विभागाला 21 मेपासून 1 कोटी 9 लाख 52 हजार 854 रूपयांचं उत्पन्न अवघ्या 8 महिन्यात मिळालं आहे. केवळ रत्नागिरी एसटी विभागातील 50 मालवाहतूक गाड्या या राज्यभर मालाची ने-आण करत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचं हक्काचा असा नवा पर्याय एसटीला उपलब्ध झाला आहे.
कोणत्या मालांची झाली वाहतूक?
21 मेपासून एसटीनं मालची ने-आण करण्यास सुरूवात केली. यामध्ये सुरूवातीला कोकणातील हापूस आंब्यानं सुरूवात झाली. त्यानंतर इतर मालांची ने-आण करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी, पुरवठादारांशी एसटी विभागानं संपर्क साधला. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सध्याचा विचार करता एसटीच्या माध्यमातून साखर, काजू, सिमेंट, पाईप्स, खते, चिरा, वाळू, किराणा, रोपे इत्यादींची वाहतूक केली जात आहे. अगदी सांगलीवरून साखर आणली तर सांगलीला परत जाताना रत्नागिरीतून खते पाठवली जातात. 21 मेपासून डिसेंबर अखेरपर्यंत रत्नागिरी एसटी विभागातील 50 गाड्यांनी 2 लाख 96 हजार 944 किमी एक प्रवास केला असून त्यातून 1 कोटी 9 लाख 52 हजार 854 रूपयांचं उत्पन्न मिळाले, अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे विभाग नियंत्रण सुनिल भोकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. दरम्यान, यापुढील काळात, कायमस्वरूपी एसटीच्या माध्यमातून मालवाहतूक सुरू राहणार असल्याची पुष्टी देखील भोकरे यांनी केली आहे.
...अन् गाडीचं झालं रूपांतर
सुरूवातीला मालवाहतुकीकरता पाच प्रवासी गाड्यांचं रूपांतर हे मालवाहतूक गाड्यांमध्ये करण्यात आलं. त्यानंतर प्रसिसाद वाढलेला पाहून 50 गाड्यांच्या माध्यमातून सध्या राज्यभरात मालाची ने - आणि केली आहे. मालवाहतुकीचा हा प्रयोग यशस्वी झाला असून एसटीला आता उत्पन्नाचा शाश्वत असा मार्ग सापडला आहे.