Parbhani News Update : परभणीतील एसटी चालकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मुजफ्फर खान जाफर खान असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. दरम्यान, खान यांच्या आत्महत्येनंतर परभणीतील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मयत खान यांचा मृतदेह परभणी आगारात आणण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 


परभणीच्या जिंतूर आगारातील बस चालक मुजफ्फर खान जाफर खान हे काल दुपारी चार वाजता जिंतूर बस स्थानकावरून निघाले होते. याच दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य प्राषण करून भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. ही बाब आज उघडकीस आल्यानंतर त्यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे एसटी कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाय मयत खान यांचा मृतदेह एसटी आगारात नेण्यासाठी आग्रह धरला. परंतु, पोलिसांनी मृतदेह हलवू दिला नाही. यावेळी एसटीचे विभागीय नियंत्रक जोशी यांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना शांत करून त्यांना खान यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलक शांत झाले.
 
दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. परंतु, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे अशाप्रकारे चालक-वाहक कर्मचारी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. त्यामुळे सरकार अजून किती बळी घेणार? असा प्रश्न जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.


महत्वाच्या बातम्या