मुंबई : एसटी संप (ST Bus Strike) कर्मचारी संपावर उद्योगमंत्र्यांशी झालेल्या बैठक निष्फळ ठरल्याने आता हा संप चिघळलाय. मागण्या मान्य होत नाहीत तोवर संपावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे काल 50 टक्के सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होऊ शकते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह कृती समितीची बैठक होणार आहे. त्यात मागण्यांवर चर्चा होईल. आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू होईल. त्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसणार आहे. औद्योगिक न्यायालयाने आजचा एसटी कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर ठरवलाय. एसटी महामंडळाने या संपाविरोधात कोर्टात धाव घेतलीय. कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे कोर्टाने दिलेत. नाहीतर एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आलेत.
आमदार गोपीचंद पडळकरांच्या सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेची मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि काही एसटी अधिकारी उपस्थितीत होते.
दरम्यान, बैठकीला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित न राहिल्याने गोपीचंद पडळकर यांच्याकडून नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात फाॅर्म्युला सादर करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, इतर संघटनांशी चर्चा न झाल्याने अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हितासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सह्याद्रीवर बैठक होणार आहे. कृती समिती, गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना देखील बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीत कृती समिती आणि पडळकर यांच्या संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामगारांच्या प्रश्नांबाबत नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचे असणार आहे. एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरील बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच संपात सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.