ST Workers Strike : अलिबाग : राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. या संपामुळे गोरगरीबांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसची चाके जागेवरच थांबली. विलीनीकरणाला पर्याय म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. सरकारच्या या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या. परंतु, काही संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. संपावर ठाम असलेल्या संघटना स्थानकाच बसची अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी बसवर दगडफेकीसारखेही प्रकार झाले. अशा प्रकारांपासून वाचण्यासाठी अलिबाग आगारातील बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवल्याचे पाहायला मिळाले.  


एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नसल्याने त्याला पर्याय म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांना 41 टक्के वेतनवाढीची घोषणा केली. या घोषणेनंतर काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत आपल्या सेवेला सुरूवात केली. परंतु, काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. अशा एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप मागे घेऊन कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. शिवाय वेतनवाढ दिल्यानंतरही संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशाराही मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचे निलंबन केले जाणार आहे. शिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेले आहे. जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी 2019  च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना कामावर घेण्यात येणार आहे. 


सरकारच्या या भूमीकेनंतर  काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. राज्यभरात अनेक आगारांमधून बससेवा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील आठ आगरांमधील बससेवा सुरू करण्यात आली असून आज अलिबाग आगारातून देखील एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी, अलिबाग एसटी आगारातून मुरुड आणि पेणसाठी गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी, अलिबाग आगारात दोन चालक कामावर रुजू झाले आहेत. तर इतर एसटी कर्मचारी अद्यापही संपात सहभागी झालेले आहेत. दरम्यान, यावेळी मुरुडकडे एसटी बस घेऊन जाणाऱ्या चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट परिधान करत आपल्या सेवेला सुरूवात केली.


चालकाची  ही कृती पाहून आगारातील कर्मचारीही आवाक झाले. परंतु, हेल्मेट घालून का असेना लालपरी सुरू केल्याबद्दल त्या चालकाचे समाजमाध्यमातून कोैतूक होत आहे. या चालकाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.  


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा


 



संबंधित बातम्या 


कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : अनिल परब


Sanjay Raut : कामावर रुजू होण्यातच एसटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचं हित : संजय राऊत ABP Majha