महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे.
दरम्यान, उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी त्यावर बारकोड असणार आहेत. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा. मात्र यावर्षीपासून पुरवणीवरही बारकोड असेल.
यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :
- दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी
- 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश
- 16 लाख 37 हजार 783 नियमित विद्यार्थी, 67 हजार 563 पुनर्परीक्षार्थी आणि 46 हजार 7 इतर (खाजगी श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषयासह प्रविष्ठ)
- बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठीही साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावरह पोहोचणं अनिवार्य
- गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी, मागच्या वर्षी 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी होते
- संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्र
- दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 252 भरारी पथकांची नियुक्ती
दरम्यान, पेपर सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये यासाठी मोबाईल जॅमर बसवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचं शकुंतला काळे यांनी सांगितलं. ''पर्यवेक्षकांनीही केंद्र प्रमुखांकडे मोबाईल जमा करणं गरजेचं आहे. पण मोबाईल जॅमर बसवण्याचे काही तोटे आहेत. याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नेटवर्कवरही होऊ शकतो. त्यामुळे हा पर्याय विचाराधीन आहे,'' असं त्या म्हणाल्या.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रम शाळेतील पेपर व्हायरल प्रकरणाचा चौकशी अहवाल आज येणार असल्याचंही शकुंतला काळे यांनी सांगितलं. ''सोलापूर पेपर व्हायरल प्रकरणात चौकशी झाली आहे, त्याचा अहवाल संध्याकाळी येईल याची अपेक्षा आहे. आज अहवाल न आल्यास सायबर गुन्हा दाखल करु,'' असं शकुंतला काळे म्हणाल्या.