नंदुरबार : आज देशभरात नऊ राज्यांतील 72 जागांवर मतदान सुरु आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार मतदारसंघाचादेखील समावेश आहे. मतदानादरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे. असे असतानादेखील नंदुरबार शहरात काही अतिउत्साही व हौशी मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.


मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. असे असूनही काही लोकांनी मतदान केंद्रावर मोबाईल नेऊन निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मतदान करतानाचे फोटो काढून हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दरम्यान भिंवडीमध्येदेखील एका हौशी मतदाराने मतदान केंद्रावर मतदान करताना स्वतः जवळ मोबाईल बाळगून मतदान कोणाला केले याचे चित्रीकरण करुन फेसबुकवर व्हायरल केले आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.