Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) वेगमर्यादा 120 किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी (Notification Issued) करण्यात आली आहे. महामार्गावरील कमाल वेगमर्यादेसंदर्भात वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे. 


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. 


समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियम :



  • वाहनचालकासह 8 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी समतल भागांत 120 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 कि. मी. प्रति तास. 

  • वाहनचालकासह 9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 100 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास. 

  • माल आणि सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 80 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास. 

  • या मार्गावर दुचाकी अणि तीन चाकी रिक्षांसह इतर वाहानांना संचार करण्याची परवानगी नाही.


नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम (Samruddhi Mahamarg News) अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण आता ऑक्टोबर उजाडूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं उद्घाटनाला मुहूर्त काही गवसत नाहीये. 


दरम्यान, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन गेल्या अनेक दिवसांपासून होऊ शकलेलं नाही. अनेकदा कामाचा दर्जा, काम सुरु असताना झालेल्या दुर्घटना यांमुळे समद्धी महामार्गाचं उद्घाटन कायम पुढे पडत गेलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही हा महामार्ग खुला करण्यात आलेला नाही. एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणचं काम अद्याप शिल्लक आहे. 


नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यावेळी हा महामार्ग पूर्ण सुरू होण्याची प्रस्तावित तारीख ही ऑक्टोबर 2021 अशी ठरविण्यात आली होती. पण मध्यंतरी जमीन अधिग्रहण, कोरोनामुळे लॉकडाऊन अशा अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे.