जालना : पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा  प्रश्न असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांसमोर आणखी नवं आव्हान येऊन ठेपलं आहे. चोरीच्या शेळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. पण या शेळ्यांचा खरा मालक समोर येत नसल्याने या शेळ्यांची रखवालदारी करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.


कुख्यात गुन्हेगारांसाठी विशेष तुरूंग तयार केले जातात. मात्र भोकरदन पोलिसांवर शेळ्यांसाठीच विशेष शेड तयार करण्याची वेळ आली आहे. शिरसगाव मंडपमध्ये चोरीच्या शेळ्यांचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत मिळालेल्या शेळ्या भोकरदन पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पोलिसांच्या कारवाईत कोणालाही अटक झाली नाही. पण पोलिसांनी तब्बल 34 चोरीच्या शेळ्या ताब्यात घेतल्या. मात्र शेळ्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. एका व्यक्तीकडून या शेळ्या सांभाळल्या जात आहेत. मात्र शेळ्या सांभाळल्याचा मोबदला मिळत नसल्याची या व्यक्तीची तक्रार आहे.

आता पोलिसांनी शेळ्यांच्या मालकांची शोधमोहिम सुरु केली आहे. अनेक जण येतात, पण अद्याप खरा मालक सापडला नाही. जोपर्यंत शेळ्यांचा खरा मालक सापडणार नाही, तोपर्यंत पोलिसांनाच शेळ्यांचा सांभाळ करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पाहता भोकरदन पोलिसांसाठी दुष्काळात तेरावा महिना आला, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

पाहा बातमीचा व्हिडिओ :