एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट : वृक्षलागवड मोहिमेचं पोस्ट मार्टम
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2017 06:42 PM (IST)
मुंबई : यंदा 4 कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य, असं आवाहन करणारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. मात्र, गेल्या वर्षी मुनगंटीवारांच्या विभागानं लावलेल्या 2 कोटी वृक्षांपैकी किती झाडं तगली? किती झाडांची माती झाली? या सगळ्यांची आकडेवारी समजल्यानंतर मुनगंटीवारांची वृक्षरोपणाची मोहीम त्या जाहिरातीपुरतीच मर्यादित आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. नागपुरातील हिंगणा एमआयडीसीत वनविभागाच्या जागेवरचं हे हिरवंगार रोप बघून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना कोण आनंद होईल! कारण त्यांच्या हातानं लावलेलं रोप आता वर्षाचं होतं आहे. अर्थात व्हीआयपी रोप असल्यानं त्याची बडदास्तही तशीच होती. पाणी, खत वेळच्या वेळी पोहोचलं. पण याच परिसरातील 798 हेक्टरवरील 10 हजार झाडांना अशी ट्रीटमेंट मिळाली नाही. त्यामुळे 50 टक्के रोपट्यांनी जीव सोडला. मोठा गाजावाजा करुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 2 कोटी 81 लाख 364 रोपांची लागवड केली. पण त्याचं पुढं काय झालंय, याचं वास्तव मोठं भीषण आहे. गेल्या वर्षीच्या 50 टक्के झाडांचा जीव गेल्यानं पुन्हा तेच खड्डे मोठे करणं, त्यात गाळ भरणं सुरु आहे. म्हणजे यंदा त्यात खड्ड्यात फक्त नवं रोपटं लावलं जाईल. महाराष्ट्रातलं जंगल झपाट्यानं कमी होत आहे. त्यावर वनमंत्र्यांनी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. ज्याचं कौतुकही झालं. पण ती झाडं जगत आहेत की मरत आहेत याची जबाबदारी कुणाची? की फक्त फोटोसेशनपुरतीच झाडांची लागवड आणि पैशांची माती करायची? याचाही विचार व्हायला हवा.