Anil Deshmukh Money Laundering Case : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. तीन प्रमुख मुद्दयांवर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावाला. प्रथमदर्शनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यावरून अनिल देशमुख यांनी मनी लाॅंड्रिंग केल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच सेक्शन 45 नुसार साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी या क्षणी कोर्ट ते तपासू शकत नाही.


29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावल्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे. ईडीच्यावतीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना ईडीनं देशमुखांच्या जामीनाला विरोध दर्शविला होता.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तास चौकशी केल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात देशमुखांची दोन्ही मुलं ऋषिकेश आणि सलिल यांच्या नावाचाही सहभाग आरोपपत्रात करण्यात आला असून न्यायालयाने दोघांनाही समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 


 






मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने छापेमारी केली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीनं पाच वेळा समन्स बजावलं होतं. मात्र, त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. यानंतर त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. तसेच त्यांना शोधण्यासाठी सीबीआयची मदत मागण्यात आली. याचदरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर ईडीनं त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळं राज्यात एकच खळबळ माजली होती.


नेमकं प्रकरण काय? - 
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटकं प्रकरण समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ही स्फोटकं ठेवण्यामागे आणि ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.