HSC Exam Paper Leak : अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंद्यात (Shrigonda) बारावीचा गणिताचा (12th Maths Paper) पेपर फुटला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊण तास आधीच पेपर फुटला होता. एवढंच नाहीतर उत्तरासहित प्रश्नपत्रिका आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर म्हणजेच, व्हॉट्सअॅपवर आल्या होत्या. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. 


यापूर्वी मुंबईत (Mumbai) बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलं होतं. त्यापाठोपाठच आता श्रीगोंद्यात गणिताचा (12th Maths Paper) पेपर फुटला आहे. बारावी बोर्ड परीक्षांमधील पेपरफुटीचं सत्र थांबायचं नावच घेत नाही आहे. श्रीगोंद्यातील या पेपरफुटीबाबत गट शिक्षण विभागानं मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाचा पेपर होता. मात्र, त्यापूर्वीच सुमारे पावणे दहाच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. मात्र, ही प्रश्नपत्रिका नेमकी कुठून फुटली याबाबत माहिती नाही. शिक्षण विभागाचे अधिकारी श्रीगोंद्यात दाखल झाले असून नेमका हा प्रकार कोणत्या केंद्रावर झाला आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. 


मुंबईत पेपर फुटला, कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक


राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने  बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. 


राज्यात याआधी राज्य सरकारच्या नोकरभरतीत पेपरफुटी झाल्याचे समोर आले होते. आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे.  शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 


बारावीचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे विधीमंडळात निवेदन


मुंबईत बारावीचा पेपर फुटला या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी 10.20 वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये 10.24 वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असं म्हणता येणार नाही असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 


लातूरमध्ये एमबीबीएसचा पेपर फुटला


नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS Exam) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटला असल्याचे समोर आले. हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI