लातूर : आधी पावसानं दिलेला ताण, त्यानंतर अचानक झालेली अतिवृष्टी आणि आता सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत. सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करून आपले हाथ वर केलेत. सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. 


लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात. मात्र, यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली. त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं. याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला. सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत. यामुळं शेतकरी आता संकटात सापडला आहे. 


लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा या गावात लांब लांबपर्यंत हिरवंगार आणि बहरलेलं सोयाबीनचं पीक दिसत आहे. लांबून पाहिलं तर हे पीक खूप उत्पन्न देणार असं सहजं वाटेल. मात्र, याच्या शेंगा पाहिल्यानंतर हा भ्रम दूर होईल. या सोयाबीनला शेंगा आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळं यात दाणेभरणीच झाली नाही. जवळपास तिनशे एकरावरील सोयाबीनची हीच परिस्थिती आहे. एकाच गावची ही परिस्थिती नसून ईथुन जवळच असलेल्या साकोळ गावातल्या शेतकऱ्यांची देखील हीच अवस्था आहे. या गावातल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अतिवृष्टीमुळं सोयाबीन वाया गेलाय, असा आक्रोश शेतकरी करतायेत. मात्र, सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करून आपले हाथ वर केलेत. अतिवृष्टीमुळं वाया गेलेल्या या सोयाबीनचा पंचनामा करून तात्काळ मदत अथवा पीकविमा मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. 


सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरुच, अवघ्या पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात तीन हजारांची घसरण


लक्कड जवळगा आणि साकोळ या गावात मिळून जवळपास 100 शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे. यासारखी स्थिति अनेक गावात आहे. मात्र, त्याची नोंद होत नाही. सरकारी नियमानुसार 33 टक्क्याच्या आत नुकसान असेल तर ग्राह्य धरत नाहीत. पहाणी करताना पिक चांगले दिसत आहे. फळ धारणा होत नाही याकडे कृषि विभागाचे लक्ष नाही. त्यांनी तशी नोंद केली तरच आम्हाला पिक विमा मिळू शकतो अन्यथा नाही. आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे दाद कुठे मागावी? असा सवाल साकोळ येथील शेतकरी संतोष डोंगरे यांनी विचारला आहे.


याबाबत कृषि विभागात माहिती विचारली असता असे काही झाले असेल तर त्याची माहिती घेऊ. फळ धारणा होत नसेल तर त्या भागातील पिकावर किड पडली असेल. त्या गावात सक्षम अधिकारी पाठवून नेमके कारण काय याचा तपास केला जाईल. त्याचे आवश्यक असतील तर पंचनामे करु. कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल तर शासकीय मदत मिळवून देण्यासाठीचे सर्व  सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले आहे.