लातूर : लातूरच्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा दर हा 5700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल तीन हजार रुपयाची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. या कारणामुळेच सोयाबीनचा हंगाम असूनसुद्धा आवकीवर परिणाम झाला आहे. 


मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनकडे वळला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारे पिके म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात आहे. देशात सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला उत्तम पावसानं साथ दिली आणि त्याच पद्धतीनं सोयाबीनचा दरही दहा हजाराच्या आसपास पोचला होता. यासर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. 


आवक सुरु, भाव पडले 


ज्या शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीन पेरणी केली आहे. त्यांची काढणी आता सुरु आहे. मृग नक्षत्रात जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली साथ दिली होती. त्या जोरावर अनेक शेतकर्‍यांनी पेरणी केली होती मात्र जुलै महिन्याच्या शेवटी ला पावसाने मोठा खंड दिला होता. शेतकरी चिंतेत होता ऑगस्ट महिन्यात पावसाने साथ देत सोयाबीनच्या पिकाला जीवदान दिलं होतं आणि याच काळात हळूहळू सोयाबीनचे भाव वाढतांना दिसत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाग मोलाची औषध खरेदी करून फवारणी करून पीक जगवले होतं. अशा शेतकऱ्यांच्या आता राशी सुरु आहेत. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक सुरु असतानाच भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले त्यावेळेस जवळपास आठ हजार 600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र हळूहळू हा दर घसरत 5700 पर्यंत आला आहे. दराची ही घसरण अवघ्या पाच दिवसांत झाली आहे. 


काढणीचा खर्च ही वाढला होता. गतवर्षी सोयाबीन काढनीचा खर्च हा एकरी 2200 पासून 2500 पर्यंत येत होता. यावर्षी हा खर्च 3500 ते 4000 पर्यंत येत आहे. शेतकरी वर्गानं हा वाढवून येणाऱ्या खर्चसाठी ही तजवीज केली मात्र बाजारात मालाचे भाव पडले आहेत. 


बाजारात आता आवक सुरु झाली आहे. त्याचवेळी भाव पडतायत. काही दिवसानंतर आवक वाढनार आहे. त्यावेळी काय दर राहतील अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आवक कमी होण्यावर झाला आहे. 


उडरगाव येथील बालाजी मोहिते यानी एकरी 15 ते 20 हजार खर्च करत सोयाबीनचे पिक घेतले "30 कट्टे माल झाला आहे. आताच काट झाला आहे. कालचा भाव आज नाही मिळत म्हणाले. बाजार असा पडत असेल तर आम्ही काय करावे. असा प्रश्न मोहिते यांना पडला आहे. 


भाव असा पडत असल्यामुळं आवक कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी राशी केल्या आहेत. ते घाईत माल घेवून बाजारात येत आहेत. यामुळे भावावर परिणाम होत आहे. काही दिवासांत हे भाव स्थिर होतील. गरज असेल तर माल बाजारात आनावा अन्यथा थांबावे असे मत व्यापारी बालाप्रसाद बिदादा यांनी व्यक्त केलं आहे.