Soybean Gulab Jamun: गुलाबजामून (Gulab Jamm) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अत्यंत गोड असलेला हा पदार्थ वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये देखील ताटात पाहायला मिळतोच. दूधापासून बनवलेला खवा आणि साखरेचा पाक याच्या मिश्रणातून बनलेला गुलाबजामून आपण नेहमीच खात असाल. मात्र आपण सोयाबीनपासून बनलेला गुलाबजामून कधी खाल्लाय का? आता तुम्ही म्हणाल सोयाबीन गुलाबजामून काय प्रकार आहे. पण हे खरं आहे की, सोयाबीनपासून गुलाबजामून बनवण्याची भन्नाट आयडिया शेतकरी गटानं शोधून काढली आहे. 


सोयाबीनपासून दूध, पनीर, खवा असे पदार्थही बनवले 


पानी फाऊंडेशननं (Panni Foundtion) यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. फार्मर कप स्पर्धेत सहभागी असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News)  कळमनुरी तालुक्यातील कवडा, वारंगा मसाई, बेलमंडळ आणि सिंदगी या गावातल्या शेतकरी गटांनी चक्क सोयाबीनपासून गुलाब जामून बनवलेत. तेही अस्सल तुपातले. इतकचं नाही तर त्यांनी सोयाबीनपासून दूध, पनीर, खवा असे पदार्थ तयार केलेत. 



फार्मर कप स्पर्धेत गटशेती बरोबरच शेतमालाचे मूल्यवर्धन


फार्मर कप स्पर्धेत गटशेती बरोबरच शेतमालाचे मूल्यवर्धन करणे या गोष्टीला देखील प्रोत्साहन दिले जाते. याचेय महत्व ओळखून कळमनुरी तालुक्यातील या शेतकरी गटाने सोयाबीनचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.  


पानी फाऊंडेशननं टाकलेल्या या पोस्टवर खूप कौतुकास्पद प्रतिक्रिया देखील येत आहेत. शरद श्रीखंडे यांनी म्हटलं आहे की, या नवीन प्रयोगाला शुभेच्छा. फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात असावी. सोयाबीन मधे प्रोटीन खूप आहे त्यामुळं ज्यांना थायोराईडचा त्रास आहे त्यानी यापासून दूर राहा, असा सल्ला देखील श्रीखंडे यांनी दिला आहे. 


किशोर कौसदीकर यांनी म्हटलं आहे की, या पदार्थांचे विक्री स्टॉल हिंगोली, कलमनुरी, नांदेड, परभणी शहरात लावला तर जोरदार प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांना फायदा होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 


चिन्मय फुटाने यांनी म्हटलं आहे की, या प्रयोगशीलतेचे मनापासून कौतुक. शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत. पानी फाउंडेशनने त्यांच्या नेमक्या अडचणी ओळखून तिथे मदत करावी. सातत्याने 5 ते 10 वर्ष असे काम केले तर नक्कीच भरीव काम उभे राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. 


ही बातमी देखील वाचा


आईला वाटायचं पोरगं बीडीओ व्हावं; पठ्ठ्या आधी IPS अन् नंतर IAS झाला! क्रिकेटवेड्या सातारकर पोराची भन्नाट गोष्ट