बीड : बीड येथील एका महिलेने गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफी केली होती. या सोनोग्राफीनंतर तिला जुळी मुलं होतील असे सांगण्यात आले. बुधवारी त्या महिलेची प्रसुती झाली. परंतु महिलेने तिळ्यांना जन्म दिल्यामुळे बाळाच्या आईसह डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर या महिलेला बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन तासात या महिलेची प्रसूती झाली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

दरम्यान, काही वेळातच गर्भात हालचाल सुरु झाली. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. तेव्हा गर्भात तिसरे बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेची प्रसुती केली. नवजात बालकांमध्ये दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मुलीचे वजन दोन किलो तर दोन मुलांचे वजन प्रत्येकी दीड किलो आहे. मुलांचे वजन कमी असल्यामुळे दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या महिलेने प्रसुतीपूर्वी सोनोग्राफी करुन घेतली होती. सोनोग्राफीमध्ये दोन बाळं असल्याचे डॉक्टरांनी पाहिले होते. तरीदेखील तिसरं बाळ जन्माला आलं. त्यामुळे सोनोग्राफी मशीन खराब आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन मुलांच्या जन्मानंतर महिलेवर शस्त्रक्रिया केली असती, तर गर्भातील तिसऱ्या बाळाला आणि आईच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, त्यामुळे सोनोग्राफी मशीनमधील खराबीमुळे मोठा अनर्थ झाला असता, याची शक्यता नाकारता येत नाही.



VIDEO | बीड : एक शरीर, दोन तोंडं, अंबाजोगाईमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म