जळगाव : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यू होणे असे प्रकार घडत आहेत. रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जळगावात हातगाडीवर रुग्णाला रुग्णालयात नेण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सर्व प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.


भुसावळ शहरातील तेली मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या कमलाबाई मालवीय नावाच्या महिलेला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांनी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्ण वाहिकेचा शोध सुरू केला. त्यासाठी भुसावल नगर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला त्यांनी फोन करून संपर्क केला. मात्र रात्र झाल्याने चालक नसल्याने रुग्णवाहिका मिळू शकणार नाही असे उत्तर त्यांना देण्यात आले. रुग्णवाहिका मिळणार नसल्याने नातेवाईकांनी रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र रिक्षाही वेळेवर मिळू शकली नाही. महिलेची प्रकृती जास्तच ढासळत असल्याचे लक्षात आल्यावर परिसरात असलेल्या हातगाडीवर सदर महिलेला नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आणि त्यानुसार त्यांनी महिलेला हातगाडीवर खासगी रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात वेळेवर दाखल केल्याने महिलेचा जीव वाचला असला तरी भुसावल नगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार मात्र या घटनेने उघड झाला आहे. एकीकडे लाखो रुपये शासन रुग्णांवर उपचारासाठी खर्च करीत आहे. मात्र भुसावळ नगरपालिकेमध्ये केवळ जुन्या अवस्थेमधील रुग्णवाहिका असावी आणि तिचाही चालक वेळेवर उपलब्ध होत नसेल तर पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या सारखी दुसरी घटना घडायला वेळ लागणार नाही. या घटनेने भुसावळकर संताप व्यक्त करत आहे.


या घटनेबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकरी संदीप चित्रवार यांनी घटना घडल्याचे मान्य केले आहे. भुसावळ नगरपालीकेत एकच जुनी रुग्णवाहिका आहे. त्यावर असलेला चालक हा संपूर्ण दिवस ड्युटी करून रात्री घरी गेलेला होता. मात्र रुग्ण गंभीर असल्याच नातेवाईकांनी त्याला फोन करून सांगितलं होतं. मात्र त्याने या घटनेत दुर्लक्ष केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले असल्याने या घटनेची अधिक चौकशी करून रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याच सांगितलं आहे. या पुढे असा कोणताही प्रकार होणार नाही याची काळजी नगरपालीका प्रशासन घेईल अस आश्वासन ही मुख्याधिकारी यांनी दिले आहे.


संबंधित बातम्या :



पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनानं निधन



कोव्हिडं काळात सरकाने केवळ ओरबाडण्याचं काम केलं : संदीप देशपांडे


कोट्यावधींचं कोविड सेंटर उभारलं, पण एकही कार्डियाक अॅम्ब्युलन्स नाही? रायकर यांच्या बहिणीचा सवाल