वर्धा : सध्या राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कमी केल्यानं चांगलंच वादंग उठलं आहे. यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावरून काही नेत्यांना सिक्युरिटीची जास्त हौस आहे, अशी टीका केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यमंत्री अब्दुल सत्तार वर्ध्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सुरक्षेच्या मुद्यावरून टीका केलीय. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना मॉरल सपोर्ट व्हावा, त्यांचं मनोबल वाढावं, याकरिता असे दौरे करण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.


सरकारने नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, काढलेली नाही आहे. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर यांनीच सिक्युरिटी कमी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या सिक्युरिटी काढल्या. भाजप नेत्यांना दोन नेत्यांची सिक्युरिटी काढल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे. दिल्लीत सरकारमध्ये बसल्यानंतर यांनीच विरोधी पक्षांची झेड प्लस, वेगवेगळ्या कॅटेगरींची सिक्युरिटी काढली होती. विरोधी पक्ष नेत्यांना अधिकृत लागणारी सिक्युरिटी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनाही सिक्युरिटी देण्यात आली आहे, असं अब्दुल सतार यांनी म्हटलं आहे.


काही लोकांना जास्त सिक्युरिटीची हौस आहे.. राज्यात कोरोनाच संकट आहे. पोलीस मोठं काम करत आहेत. कोरोना संकटामुळे सिक्युरिटी कमी करण्यात आली. हा राजकीय विषय नाही, असंही ते म्हणाले.


राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात, भाजप नेते म्हणतात, आम्हाला सुरक्षेची गरज नाही!


बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात


राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.