सोलापूर  : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत.  लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले आहेत. शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू राहणार आहेत. तर विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कार ही नियमितपणे पार पाडता येणार आहेत. उद्या सोमवार सकाळी 7 वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत. 


शहर-जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि त्याठिकाणी असलेली ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता असे निकष लावण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात सोलापूर शहरातील रुग्ण व बेडची उपलब्धता पाहून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या पूर्णपणे आटोक्‍यात आल्याने शहरातील बरेच निर्बंध पूर्णपणे शिथल करून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. 


नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असून नियम मोडणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दंड भरावा लागणार आहे, असं आदेशात म्हटलं आहे.


काय सुरु काय बंद? 
- खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्‍के उपस्थिती
- अंत्यसंस्कारासाठी कोणतीही मर्यादा नसणार; पूर्वीप्रमाणे अंत्यविधी होतील
- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, मॉनिंग वॉक नियमितपणे सुरू 
- क्रीडा, मनोरंजन, जीम, मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
- सलून, स्पा, ब्युटी पार्लर, बससेवा, मालवाहतूक नियमितपणेच सुरू 
 
सोलापूर ग्रामीण भागात काय?


सोलापूरचा ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यातच असल्याने सध्या असलेल्या सवलतींना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.
4 ते 10 जून या आठवड्यातील सोलापूरच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा 5.10 टक्के आहे. या कालावधीतील ऑक्‍सिजन बेडस टक्केवारी 20 टक्के आहे. सोलापूरचा ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. यापूर्वी सोलापूरचा ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यातच होता. त्यामुळे 7 जून रोजी अनलॉकच्या ज्या सवलती ग्रामीण भागाला दिल्या होत्या, त्याच सवलती पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवल्या जाणार आहेत.