Solapur Ujani Dam News : सध्या राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) येणाऱ्या पाण्याचा प्रवाह देखील मागील 8 दिवसात वाढला आहे. उजनीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे,


उजनीचा पाणीसाठा सध्या मायनस 24 टक्क्यांवर


मागील दीड महिन्यात धरणात जवळपास 35 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्याला फायदा होणार आहे. उजनीच्या धरणक्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं येत्या काळात उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी उजनीची पाणी पातळीत मोठी घट झाली होती. सध्या 35 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असला तरी उजनी सध्या स्थितीत मायनस 24 टक्क्यांवर आहे. ऑगस्ट महिन्यात धरण मृतसाठ्यातून बाहेर येईल असा अंदाज उजनी लाभक्षेत्र प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं


उजनी धरण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील मोठं शेतीचं क्षेत्र बागायती आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं महत्वं मोठं आहे. मात्र, मागील वर्षी उजनी धरण हे 64 टक्केच भरलं होतं. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते, त्यावेळी पिकांना पाणी मिळालं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची हातची पिकं वाया गेली. यावर्षी मात्र, हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस होत आहे. उजनी धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येण्यासाठी पुणे जिल्ह्यात देखील चांगल्या पावसाची गरज आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या धरणातून पाणी उजनीत सोडले जाते. त्यामुळं क्षमतेनं मोठं असणारं धरण देखील वेगाने भरते. त्यामुळं उजनी धरण लवकर भरण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उजनी धरणातून नुसता गाळ काढला तरी सरकारला 9 हजार कोटी मिळतील, 11 TMC पाणीही वाढेल, नेमकं गणित काय?