सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी... स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर भेटीचे अनेक दाखले दिले जातात. पण तसा संबंध दाखवणारे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाहीत. मात्र 'एबीपी माझा'ने तुळजाभवानीचा असा एक महत्त्वाचा अलंकार शोधला आहे, जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगतो. करोडो रुपये किंमत असलेला हा दागिना 'माझा'च्या टीमला तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात सापडला.


तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात एकूण सात पेट्या आहेत. गुप्त कळ दाबल्याशिवाय गुप्त खजिना उघडत नाही. खजिन्याच्या खोलीत चिटपाखरुही जाऊ शकत नाही. खजिना पुरातन दागिन्यांच्या पेट्यांनी भरुन गेला आहे. पेट्यांमध्ये शेकडो वर्ष जुने अलंकार आहेत. प्रत्येक अलंकारात माणिक, मोती, पाचू, हिरे आहेत. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.

खजिन्यातील प्रत्येक दागिन्याला एक इतिहास आहे. अलंकाराच्या पहिल्या क्रमांकाच्या पेटीत देवीच्या वर्षभर चालणाऱ्या सोहळ्यांसाठीचे अलंकार असतात. एक एक अलंकार चढवत शेवटी देवीचा मुकूट सजतो.

देवीच्या खजिन्यात 41 नेत्रजोड आहेत. मुकूट पाच शतकांपेक्षा जुना आहे. त्यावर मोत्याचा तुरा. मध्यभागी पुष्कराज हिरा. चारी बाजूने माणिक. असा माणिक मोत्यांचा शिरपेच. मुकुटावर हिऱ्यांची महादेवाची पिंड. पिंडीत हिरकणींची बेलाची पानं. शेकडो वर्षापासून स्त्रिया घालायच्या तेवढी कर्णफुलं देवीला आहेत.

एक हजार 560 ग्रॅम वजनाची मोहरांची माळ हा छत्रपती शिवाजी महाराजांशी थेट नाते सांगणारा अलंकार. संभाजी महाराजांचे दोन चांदीचे सिंह. सुमारे दोन फूट उंच आणि अडीच फूट लांबीचे आहेत. रथ अलंकार महापूजेसोबत हे सिंह मांडले जातात.
सिंहांची चांदीची जिभ हलते. एक सिंह 30 किलो वजनाचा आहे, तर त्याची लांबी 5 फूट आहे.

महादजी शिंदे यांच्या मुलींना अर्पण केलेली हिऱ्याची वेणी हा जगातला एकमेवाद्वितीय दागिना ठरावा. 356 ग्रॅम वजनाच्या वेणीवर नागाचे वेटोळे. त्यापाठोपाठ चंद्र, सूर्य, केवड्यांची पानं आणि दशावतार.

देवीच्या खजिन्यात मध्यभागी पाचू असलेल्या मानकांची अनेक पदकं आहेत. या पदकांत शिंपल्याच्या आकाराचे मोती. 21 माणिक. 21 पाचूंची माणकांची माळ. सुर्याच्या आकाराच्या हारावर जाळीदार नक्षीकाम आहे. काही दागिन्यांवर निजामशाहीच्या संस्कृतीचा प्रभाव दिसतो. एक हजार 836 ग्रॅम वजनाची पाच पदरी माळ फ्रान्सचा सेनापती बुसीने 15 व्या शतकात अर्पण केली, असा अंदाज आहे.

तुळजाभवानीच्या खजिन्यात शतकानुशतके स्त्रिया जे अलंकार घालायच्या तेवढे सगळे अलंकार आहेत. सात पदरी जवस माळ,
अस्सल 53 हिऱ्यांची माळ. देवीचे अलंकार 12 बाय 9  इंच आकाराच्या प्राचीन सुबक पेट्यात ठेवले जातात. पेट्यांना दोन्ही बाजूंनी पकडण्यासाठी कानकोंडा आहे.

तुळजापूरच्या जगदंबेचं अस्सल चांदीचं आसन 1856 साली तयार करण्यात आला. सिंहासनावर गदाधारी हनुमान, अष्ट भैरव, दोन भैरवाच्या हातात नरमूड माळा, शेजारी गरुड आहे. देवीच्या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.

महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा हा खजिना डोळे दिपवणारा आहे. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.