सोलापूर : जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी पुष्कराज काडादी यांची निवड करण्यात आली आहे. को-जनरेशनच्या चिमणीमुळे सिद्धेश्वर सहकारी कारखाना तसेच तत्कालीन अध्यक्ष धर्मराज काडादी हे नेहमी टीकेचे धनी बनत होते. मागील अनेक वर्षांपासून काडादी यांच्याविरोधात सोलापुरात आवाज उठवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे हतबल झालेले धर्मराज काडादी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे बोलत होते. काही दिवसांपूर्वी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धर्मराज काडादी यांचे संपूर्ण पॅनेल बिनविरोध निवडून आले. या निवडणुकांनंतर नूतन संचालक मंडळाची संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. 


निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाची विशेष सभा आज पार पडली. या सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा विषय होता. अध्यक्ष पदासाठी धर्मराज काडादी यांचे पुत्र पुष्कराज काडादी यांचा एकमेव अर्ज आला होता. तर उपाध्यक्षपदासाठी सिद्धाराम चाकोते यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे या दोघांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. 


सिद्धेश्वर सहकारी कारखान्यावर अनेक वर्ष काडादी परिवाराची एकहाती सत्ता आहे. मागील अनेक वर्षांपासून धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र कारखान्याजवळ असलेल्या होटगी रोड विमानतळाची सेवेला याच कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल विमान प्राधिकरणाने दिला होता. काही दिवसांपूर्वी पर्य़ावरण मंडळाने देखील चिमणी बेकायदेशीर असून पर्य़ावरण मंडळाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा निर्वाळा दिला होता. 


यामुळे कारखान्याची वीज सेवा तसेच पाणी पुरवठा बंद कऱण्याचे आदेश देखील पर्यावरण मंडळाने दिले होते. सोबतच सोलापुरात विमानसेवा सुरु व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचची स्थापना झाली. विविध क्षेत्रातील नागरिक एकत्रित येऊन कारखाना तसेच धर्मराज काडादी यांच्याविरोधात आंदोलन होऊ लागले. या सगळ्यांमुळे धर्मराज काडादी हतबल देखील झालेले पाहायला मिळाले. पंचवार्षिक निवडणुकांच्यावेळी सभेत बोलताना सातत्याने होणाऱ्या टीकांना मी कंटाळलोय. त्यामुळे नव्यांना संधी दिली पाहिजे असे उद्विग्न वक्तव्य केले होते. 


मात्र आज झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीत मुलाचे नाव पुढे करुन काडादींनी कारखान्याची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवली आहे. 'सभासदांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्याची कशासोबतही तुलना करता येऊ शकणार नाही. मागील काही वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून कारखाना आणि माझ्यावर टीका करणारी जी मंडळी होती. त्यांना ही खऱ्या अर्थाने चपराक आहे. काडादी कुटुंबिंयावर सभासद शेतकऱ्यांनी जे प्रेम दाखविले, ते मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या ऋणात राहून कारखान्याच्या भरभराटीसाठी जे काही करता येईल. ते आम्ही काडादी कुटुंबिय करु." अशी प्रतिक्रिया धर्मराज काडादी यांनी दिली.  


महत्त्वाच्या बातम्या :