सोलापूर : मागील काही महिन्यांपासून फेसबुकवर बनावट अकाउंट तयार तयार करून वेगवेगळी कारण सांगून पैसे लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येतंय. सामान्यतः समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी इत्यादी व्यक्तींचे फेक प्रोफाईल बनवून फसवणूकदार पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापुरात देखील असाच प्रकार घडला होता. 


जानेवारीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या बनावट अकाऊंटचा वापर करून भामट्याने न्यायाधीशांच्या मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच पैशांची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना फोन पे/गुगल पे चे नंबर देवून पैशांची मागणी केली.  त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे 10,000 रूपये आणि 7,000 रूपये रक्कम दिलेल्या मोबाईलवर पाठवले होते. मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


धक्कादायक बाब म्हणजे आक्टोबर महिन्यात सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावाने देखील बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. तेजस्वी सातपुते यांच्या खऱ्या अकाउंटवरील माहितीचा वापर करून तसेच दिसणारे बनावट अकाउंट भामट्यानी तयार केले. तसेच तेजस्वी सातपुते यांचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मेसेज पाठवून पैशाची मागणी केली होती. 


हा सगळा प्रकार गंभीर असल्याने अज्ञात इसमाविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेलं होता. या दोन्ही गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण दलातील सायबर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांच्याकडे देण्यात आलेला होता. तांत्रिक तपास आणि विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती जमा करण्यात आली. आरोपी हे राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांची दोन तपास पथके तयार करून उत्तरप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी रवाना करण्यात आले.


दोन्ही पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्हयातील 1-1 असे एकूण 02 आरोपीना अटक केली. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेले मोबाईल फोन तपासकामी जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींन न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :